

मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार व शरदचंद्र पवार हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला असून, नेतेमंडळीदेखील त्यासाठी आग्रही असल्याचे दिसत आहे. भाजपाचा विजयरथ रोखण्यासाठी या दोन्ही पक्षांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नसून, तसे न झाल्यास महापालिकेची सत्ता पुन्हा हातातून निसटण्याची शक्यता असल्याचे मत पक्ष पदाधिकाऱ्यांतून व्यक्त केले जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. नव्वदच्या दशकापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराचे नेतृत्व करत अनेकांना विविध पदे दिली आहे. अनेक कार्यकर्त्यांना मोठे केले आहे. अजित पवार यांनीच शहराचा विकास केला असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला जातो. सन 2014 नंतर केंद्र व राज्यात सत्ता बदल झाल्या. त्यानंतर अजित पवार यांच्या सर्मथकांनी मोदी लाटेत घड्याळाची साथ सोडत भाजपाचे कमळ हाती घेतले. परिणामी, फेबुवारी 2017 च्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाची महापालिकेवर एकहाती सत्ता आली. भाजपाने 77 जागा जिंकल्या. तर, एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 36 जागेवर समाधान मानावे लागले. अनेक प्रभागांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. तर, अनेक जागांवर अवघ्या काही मतांच्या फरकाने उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.
त्याची समीकरणे मांडत राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे आग्रही विनंती अजित पवार यांना केली आहे. त्याला पवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी तशी भूमिका मांडली आहे. तसेच, पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तसा प्रस्ताव अजित पवार यांना दिला असून, त्याबाबत प्राथमिक चर्चाही झाली आहे. मात्र, महायुतीत भाजपासोबत येणार नसल्याची अट ठेवण्यात आली आहे, असे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी स्पष्ट केले आहे. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आम्हाला आनंद होईल, असे ही ते म्हणाले आहेत. तसेच, शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनीही भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीसह इतर पक्षांना सोबत घेण्याची तयारी दर्शविली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास महापालिका निवडणुकीत यशाचा आलेख उंचावण्यास मदत मिळणार आहे.
राष्ट्रवादीचे अनेक जण भाजपाच्या वाटेवर ?
फेबुवारी 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक फोडून आपल्या पक्षात घेतले. त्यामुळे भाजपाला महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यात यश आले. त्याप्रमाणे यंंदाच्या निवडणुकीतही भाजपाने राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक फोडण्याचे तंत्र अवलंबले आहे. त्यासाठी शहरात पडद्यामागे वेगात हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज माजी नगरसेवक तसेच, पदाधिकारी भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांनी भाजपाचे कमळ हाती घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. परिणामी, शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्व धोक्यात येऊ शकते.
राष्ट्रवादीला शह
भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध कामांबाबत सूचना केल्या. त्यांनी शहराचा तीन दिवस दौरा करीत विधानसभानिहाय निवडणुकीचा आढावा घेत पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. या दौऱ्यावरून राजकीय क्षेत्रात वेगवेगळे दावे केले जात आहेत. पाटील यांनी शहरामध्ये हायबिड युती करणार असल्याची घोषणा केली आहे. तर, अजित पवार यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याने भाजपाची डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटत असलेली निवडणुकीत आता चांगलेच रंग चढू लागले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यास भाजपाला निवडणूक सोपी राहणार नसून, त्याची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी एक झाल्यास भाजपाची डोकेदुखी वाढणार ?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जनसंवादाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच, पवार यांनी राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रम घेत माजी नगरसेवकांच्या घरी जात छोटे-छोटे मेळावे घेतले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत हालचालींना वेग
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्याने त्याचा फायदा विरोधकांना होतो. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबत हालचाली सुरू आहेत. भाजपासोबत महायुतीमध्ये आम्ही लढण्यास तयार नाही. आम्ही स्वबळावर तयारी केली आहे. त्यातच आमच्यासोबत शरदचंद्र पवार पक्ष आला, तर आम्हाला आनंदच होईल. त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. गेल्या नऊ वर्षातील भाजपाचा कारभार पाहता शहराला नियोजनबद्ध विकासाकडे नेण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. महापालिकेचा महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले.
भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्व समविचारी पक्षांचे स्वागत
भष्टाचारी भाजपाला पराभूत करण्यासाठी तसेच, महाविकास आघाडीमध्ये शाहू, फुले, आंबेडकर विचारधारेचे पक्ष, संघटना सहभागी होणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होण्याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. ते जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही कायम असू, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले.
ते एकत्र आल्यास भाजपाला काही फरक पडत नाही
ते एकत्र आले किंवा नाही याचा आम्हांला काही फरक पडत नाही. आम्ही स्वबळावर लढण्यासाठी सर्व 128 जागांवर तयारी पूर्ण केली आहे. शंभरपेक्षा अधिक नगरसेवक भाजपाचे असतील. मतदार भाजपासोबत आहेत. संघटन आणि बूथ रचनाही झाली आहे. चारही आमदार जोमाने कामाला लागले आहेत. संपूर्ण ताकदीने आम्ही निवडणुकीत उतरत आहोत. नेते चंद्रकांत पाटील यांनीही नुकताच शहराचा दौरा केला. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शहरात येणार आहेत. कोणी कुठे गेले किंवा एकत्र झाल्यास आम्हाला काही त्याच्याशी घेणे देणे नाही, असे भाजपाचे शहराध्यक्ष शत्रृघ्न काटे यांनी सांगितले.