

लोणावळा: मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर शनिवारी (दि. २६) दुपारी तीन वाजताच्या सुमारास तीन वाहनांचा भीषण अपघात मिसिंग लिंकजवळ झाला. उतारावर तीन वाहने एकमेकांना जोरात धडकल्यामुळे झालेल्या या अपघातामध्ये एका चालकाचा मृत्यू झाला असून, अन्य दोन जण जखमी आहेत.
संदीप कोळी (वय 35, रा. कुंभोज, कोल्हापूर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने फेविकॉल सदृश केमिकल घेऊन जाणारा आयशर टेम्पोवरील चालक संदीप कोळी याची गाडीवरील नियंत्रण सुटलेले उतारावर तो समोर जाणाऱ्या दुसऱ्या एका टेम्पोला मागून जोरात धडकला.
ही धडक एवढी भीषण होती की समोरचा टेम्पो हा त्याच्या पुढे जाणाऱ्या एका ट्रेलरला मागून जोरात धडकला. या अपघातामध्ये केबिनमध्ये अडकल्यामुळे चालकाचा मृत्यू झाला, तर अन्य चालक हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर टेम्पोमधील फेविकॉल रस्त्यावर सर्वत्र पसरले तसेच समोरच्या टेम्पोमधील पुठ्ठे हेदेखील रस्त्यावर पसरल्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातामुळे मुंबई लेनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
अपघाताची माहिती समजतात बोरघाट महामार्ग पोलिस खोपोली पोलिस व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहनांमधील चालकांना बाहेर काढले. घटनास्थळावरील फेविकॉल व अपघातग्रस्त वाहने बाजूला करत तासाभरात रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.