Pimpri Chinchwad DJ Free Ganesh Visarjan: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘डीजे’मुक्त गणेश विसर्जन; ९१ गुन्हे, ८६ साऊंडसह वाहने जप्त

बहुतांश मंडळांकडून ढोल-ताशांना प्राधान्य; पिंपरीत ८४.५ तर चिंचवडमध्ये ८८.२ डेसिबल ध्वनिपातळी
 DJ
DJ Pudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी आणि चिंचवड परिसरातील अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणुका शुक्रवार (दि. २५) 'डीजे'मुक्त वातावरणात शांततेत पार पडल्या. मागील काही वर्षांपासून विसर्जन मिरवणुकांमध्ये वाढलेल्या मोठ्या क्षमतेच्या 'डीजे'च्या वापराला यंदा प्रथमच प्रभावीपणे आळा घालण्यात पोलिसांना यश आले. पाचव्या, सातव्या आणि नवव्या दिवसाच्या विसर्जना वेळी केलेल्या कठोर कारवाईचा परिणाम शुक्रवारी निघालेल्या अंतिम मिरवणुकांमध्ये दिसून आला. बहुतांश मंडळांनी 'डीजे'ला फाटा देत ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला निरोप दिला.

 DJ
Pimpri Chinchwad Police Employee: पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये नियमबाह्य 'डीजे' आणि मोठ्या साऊंडचा वापर करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आक्रमक धोरण स्वीकारले. केवळ सूचना किंवा नोटिसांपुरते मर्यादित न ठेवता गुन्हे दाखल करून साऊंड सिस्टिम आणि वाहने जप्त करण्यात आली. त्यामुळे अनंत चतुर्दशीपूर्वीच नियम मोडल्यास थेट कारवाई होणार असल्याचा स्पष्ट संदेश मंडळांपर्यंत पोहोचला होता. पोलिसांनी १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान 'डीजे' आणि ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ९१ गुन्हे दाखल केले. तसेच, ८६ 'डीजे' साऊंडसह वाहने जप्त केली. या सलग कारवाईमुळे अंतिम विसर्जनाच्या दिवशी मंडळांनी सावध पवित्रा घेत मोठ्या साऊंडचा वापर टाळला.

 DJ
Pakistani Beauty Cream: 'मेड इन पाकिस्तान' क्रीमची पिंपरीत विक्री; २३ क्रीम जप्त

गणेशोत्सवात ध्वनिपातळीने ओलांडली मर्यादा

यंदाच्या गणेशोत्सवकाळात डीजेविरहीत मिरवणुका पार पडल्या असताना गणेश मंडळांच्या ढोल-ताशांच्या वादनानेदेखील ध्वनी पातळची मर्यादा ओलांडल्याचे दिसून येत आहे. शहरात शुक्रवार (दि. २५) रोजी मिरवुणकीमध्ये ढोल -ताशा, घंटानाद यामुळे आवाजाने मर्यादा ओलांडली होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्राथमिक अहवालानुसार शुक्रवार (दि. २५) पिंपरी येथे ८४.५ आणि चिंचवड येथे ८८.२ डेसिबल आवाजाची नोंद झाली आहे. रात्रीच्या वेळीदेखील हा आवाज ८२ ते ८५ डेसिबलपर्यंत होता. नियमानुसार निवासी भागात दिवसाची मर्यादा ७५ डेसिबल आणि रात्रीची मर्यादा ७० डेसिबल आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पर्यावरण अहवालात शहरातील विविध भागातील ध्वनी प्रदूषणाची आकडेवारी देण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मडळाने ठरवून दिलेल्या क्षेत्रनिहाय ध्वनिस्तर प्रमाणाची मर्यादा शहरातील विविध भागात ओलांडली आहे. व्यावसायिक भागात दिवसा ध्वनिपातळी ६५ तर रात्री ५५ डेसिबल असणे अपेक्षित आहे. तर औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ रात्री ७० डेसिबल्स इतकी ध्वनी मर्यादा हवी. दुसरीकडे निवासी भागांमध्ये दिवसा ५५ तर रात्री ४५ डेसिबल्स इतकी ध्वनी मर्यादा हवी. मात्र शहरातील विविध निवासी भागांमध्ये ध्वनीची सरासरी पातळी ही ७५ ते ८५ डेसिबलच्या पुढे आढळून आली आहे. ढोलपथकांच्या एकत्रित वादनामुळे आणि अरुंद रस्त्यांमुळे आवाजाची पातळी वाढल्याचा अंदाज मंडळातर्फे व्यक्त केला जात आहे. एका ढोलचा आवाज १०० डेसिबलपर्यंत जातो. मिरवणुकीमध्ये ३० ते ४० ढोल एकत्र आल्यावर मर्यादा ओलांडली जाते.

 DJ
Pimpri Chinchwad Traffic Changes: विसर्जनासाठी शहरातील वाहतुकीत बदल; विविध मार्गांवर प्रवेशबंदी

अध्यक्ष, 'डीजे'चालकांना तंबी

अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकांची तयारी सुरू असताना काही ठिकाणी वाहनांवर मोठ्या साऊंडच्या थप्पी लावण्यात आल्या होत्या. मात्र, मिरवणुका सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी हस्तक्षेप करून त्या खाली उतरविण्याच्या सूचना दिल्या. मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच 'डीजे'चालक आणि मालकांना नियमांची स्पष्ट कल्पना देत उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल करून साऊंड व वाहन जप्त करण्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे अनेक ठिकाणी मिरवणूक सुरू होण्यापूर्वीच मोठ्या साऊंडचा वापर रोखण्यात आला.

कारवाईपेक्षा 'डीजे' रोखण्यावर भर

यंदा 'डीजे' सुरू झाल्यानंतर कारवाई करण्याऐवजी तो सुरूच होऊ नये, यावर पोलिसांनी भर दिला. मिरवणूक मार्गावर तैनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंडळांच्या साऊंड व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवले. वाहनांवर मोठ्या क्षमतेचे स्पीकर लावले जात असल्याचे निदर्शनास येताच संबंधितांना सूचना देण्यात आल्या. त्यामुळे 'डीजे' सुरू झाल्यानंतर तो बंद करण्यावरून निर्माण होणारे वाद आणि तणावाचे प्रसंगही टाळता आले.

विसर्जन मिरवणुकांचे चित्र बदलले

मागील काही वर्षांत विसर्जन मिरवणुकांमध्ये वाहनांवर एकावर एक स्पीकर रचून मोठ्या साऊंडच्या भिंती उभारण्याचे प्रमाण वाढले होते. त्यातून मंडळांमध्ये आवाजाची स्पर्धाही निर्माण होत होती. यंदा मात्र पिंपरी आणि चिंचवडमधील प्रमुख विसर्जन मार्गांवर हे चित्र जवळपास गायब होते. मोठ्या 'डीजे'ऐवजी ढोल-ताशा, हलगी आणि इतर पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यात आला. 'डीजे' नसतानाही कार्यकर्त्यांच्या उत्साहात कमतरता जाणवली नाही. ढोल-ताशांच्या तालावर जल्लोष करत मंडळांनी मिरवणुका काढल्या. त्यामुळे गेल्या काही वर्षांत 'डीजे'च्या दणदणाटात झाकोळलेले पारंपरिक गणेशोत्सवाचे स्वरूप यंदा पुन्हा ठळकपणे पाहायला मिळाले.

'डीजे' नसल्यामुळे शिस्तबद्ध मिरवणुका

मोठ्या क्षमतेच्या 'डीजे'चा वापर थांबल्याने मिरवणूक मार्गालगत राहणाऱ्या नागरिकांना कर्णकर्कश आवाजाचा त्रास कमी झाला. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि कुटुंबांसह विसर्जन पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी वातावरण तुलनेने सुसह्य राहिले. मोठ्या साऊंडचा अडथळा नसल्याने मिरवणूक व्यवस्थापनातही शिस्त राखण्यास मदत झाली. मंडळांनी नियमांचे पालन केल्याने पोलिसांना 'डीजे' बंद करण्यासाठी वारंवार हस्तक्षेप करण्याऐवजी गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेवर अधिक लक्ष केंद्रित करता आले.

 DJ
Pimpri Chinchwad Ganesh Visarjan: बाप्पाच्या विसर्जनासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज! १०१ कृत्रिम हौद, जीवरक्षक अन् अग्निशमन पथके तैनात

पोलिस-कार्यकर्त्यांमधील संघर्ष टळला

मागील काही वर्षांत 'डीजे' बंद करण्याच्या सूचनांवरून पोलिस आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत होते. काही ठिकाणी साऊंड बंद करण्यासाठी पोलिसांना थेट हस्तक्षेप करावा लागत होता. यंदा मात्र सुरुवातीपासून एकसमान आणि कठोर धोरण अवलंबल्याने अंतिम विसर्जनाच्या दिवशी संघर्ष झाला नाही. मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही पोलिसांच्या सूचनांना प्रतिसाद दिला. त्यामुळे मोठ्या साऊंडच्या दणदणाटाविना आणि कोणताही मोठा तणाव निर्माण न होता पिंपरी-चिंचवडमधील विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या.

३१ मंडळांचा बाप्पाला निरोप

चिंचवडगावामध्ये ३१ मंडळांनी गणेश मूर्तीचे विसर्जन केले. दुपारी अडीच वाजता सुरू झालेली मिरवणूक रात्री १२ वाजेपर्यंत सुरू होती. रात्री बारानंतर काही मंडळांना सादरीकरण न करता विसर्जन मिरवणूक काढली.

दहाच्या ठोक्याला छोटे साऊंडही बंद

विसर्जन मिरवणुकांमध्ये रात्रीच्या वेळेचे बंधनही काटेकोरपणे पाळण्यात आले. रात्री दहाचा ठोका पडताच पोलिसांनी मिरवणुकांमध्ये सुरू असलेले छोटे साऊंडदेखील पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना दिल्या. संबंधित मंडळांनी त्याला प्रतिसाद देत निर्धारित वेळेनंतर ध्वनिक्षेपकांचा वापर थांबविला. विशेष म्हणजे, अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकांत 'डीजे'विरोधात मोठ्या प्रमाणावर नव्याने कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर आली नाही. पाचव्या, सातव्या आणि नवव्या दिवशी झालेल्या जप्ती आणि गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईने आधीच धाक निर्माण केला होता. त्यामुळे अंतिम मिरवणुकांमध्ये प्रतिबंधात्मक पोलिसिंगचा परिणाम अधिक ठळकपणे जाणवला.

गणेशोत्सव शांततेत आणि नियमांचे पालन करून साजरा व्हावा, यासाठी सुरुवातीपासूनच 'डीजे' व ध्वनिप्रदूषणाबाबत स्पष्ट भूमिका घेतली होती. पाचव्या, सातव्या आणि नवव्या दिवशी नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. त्यामुळे अनंत चतुर्दशीला बहुतांश मंडळांनी स्वतःहून 'डीजे' टाळून ढोल-ताशांना प्राधान्य दिले. नागरिक आणि मंडळांनी पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शहरातील विसर्जन सोहळा शांततेत संपन्न झाला.

विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news