

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोत झालेल्या दुर्घटनेमुळे शहरभरात जमा करून ठेवलेला कचर्यामुळे तसेच, सण उत्सवामुळे कचर्याचे वजन वाढले आहे. वजन वाढवून ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी शहराबाहेरील कचरा मोशी डेपोत आणला जात नाही, असा दावा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी केला आहे.
शहराचे कचर्याचे वजन वाढले; सध्या दररोज 2 हजार 100 टन कचरा संकलन, असे ठळक वृत्त दैनिक पुढारीने 19 ऑक्टोबरला प्रसिद्ध केले होते. अचानक शहरातील कचर्याचे वजन वाढल्यामुळे शंका निर्माण करण्यात येत आहेत. दररोज 1 हजार 500 टन कचरा जमा होत असताना अचानक सहाशे टन कचरा कसा वाढला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठेकेदाराला अधिक शुल्क मिळावे, म्हणून शहराबाहेरील आजूबाजूच्या गावातील कचरा गोळा करून वजन वाढण्याचा प्रकार सुरू असल्याचे आरोपही केले जात आहेत. यासंदर्भात विचारले असता अतिरिक्त आयुक्त जंगम बोलत होते.
अतिरिक्त आयुक्त जंगम म्हणाले की, मोशी कचरा डेपोत वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील अनधिकृत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 कर्मचार्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार 8 जुलै 2026 ला घडला. तेव्हापासून मोशी डेपोत कचरा वाहतूक करणारे वाहने ये-जा करणे बंद झाल्याने शहरात कचर्याची समस्या निर्माण झाली होती. तात्पुरता उपाय म्हणून शहरातील काही भागांत दैनंदिन कचरा जमा करण्यात आला. तसेच, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निगडी येथील जागेत आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शंकरवाडी येथील डेपोत कचरा जमा करण्यात आला.
त्यानंतर जमा झालेला कचरा उचलला जात आहे. नियमित कचरा आणि जमा झालेला कचरा मोशी डेपोत टाकला जात असल्याने कचर्याचे वजन वाढले आहे. जमा झालेला कचरा उचलणे संपल्यानंतर कचर्याचे वजन नियमित म्हणजे कमी होईल. शहराबाहेरील गावांचा कचरा आपण घेत नाही. कोणी आपल्या शहरात कचरा गपचूप आणून टाकल्यास तो उचलण्याची महापालिकेची जबाबदारी आहे. मात्र, शहराबाहेरील कचरा आणून टाकणार्यावर तसेच, उघड्यावर कचरा टाकणार्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यासाठी भरारी पथकांसह ग्रीन मार्शल नेमण्यात आले आहेत. पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या तसेच, एसआयआरच्या कामातून कर्मचारी मुक्त झाल्यानंतर ती कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कचर्याच्या वजनवाढीनुसार शुल्कवाढ हा नियम बदलणार
कचर्यावर प्रक्रिया करताना कचर्याचे वजन वाढल्यास अधिक शुल्क देण्याचा नियम बदलण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे. पूर्वीच्या जुन्या निविदेत तसा नियम नव्हता. आता, कचरा प्रक्रिया प्रकल्पात अनेक नवीन तंत्रज्ञान आणि प्रणाली आली आहे. त्यामुळे कचर्याचे वजन कमी करण्याचा नियम निविदेत समाविष्ट केला जाणार आहे. त्यामुळे ठेकेदाराचा नव्हे तर, महापालिकाचा आर्थिक फायदा होणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी सांगितले.
यामुळे कचरा वाढल्याचा दावा
गणेशोत्सव, नवरात्र उत्सव तसेच, सणासुदीत शहरातील कचरा वाढतो. त्यामुळे कचर्याचे वजन वाढते. हे गेल्या अनेक वर्षांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. सण-उत्सवामुळे सध्या कचर्याचे वजन वाढले आहे. तसेच, मोशी डेपो दुर्घटनेनंतर शहरात काही भागांत जमा झालेला कचरा उचलला जात असल्याने कचर्याचे वजन वाढले आहे, असे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी दावा केला आहे.
शहरातील वीस जागा शोधून दिल्या
आयुक्तांच्या सूचनेनुसार कचरा प्रक्रिया केंद्रांसाठी शहरातील वेगवेगळ्या वीस जागा शोधण्यात आल्या आहेत. भूमि आणि जिंदगी विभागामार्फत त्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडून त्या जागांवर कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्याबाबतची पुढील कार्यवाही केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी स्पष्ट केले.