

पिंपरी: मोशी कचरा डेपो दुर्घटनेत अडकलेल्या कर्मचार्यांचे जीव महत्त्वाचे होते. प्रत्येक कर्मचार्यांच्या बचावासाठी सुरक्षितपणे बचाव मोहीम राबवण्यात आली. त्यासाठी सर्व प्रकाराची यंत्रणा राबवण्यात आली, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवार (दि. ११) महापालिकेने राबवलेले बचाव कार्य मंदावले असल्याची चर्चा शहरात सुरू होती. त्यावर आयुक्त बोलत होते.
ते म्हणाले की, शोधकार्य मंदावले नाही. शोधकार्य कठीण व अवघड होते. कोसळलेल्या इमारतीमधील छोट्या खोलीत आठ लोक अडकले होते. इमारत फोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न कण्यात आला. एकूण बारा मशिनच्या माध्यमातून कचरा हटविला गेला. त्यानंतरही नवीन दहा मशिन आणून, त्याद्वारे कचरा हटविण्यात आला. इमारतीचे स्लॅब तोडण्यासाठी विशेष मशिन शुक्रवार (दि. १०) रात्रीपासूनच बचावकार्यात लावण्यात आले होते. स्लॅब तोडण्याचे कामही खबरदारीनेच करण्यात आले. तेथील परिस्थितीनुसार बचाव कार्य राबवण्यात आले.
बचाव कार्य अतिशय कठीण होते. तेथे कचरा असल्याने मिथेन गॅस तयार होत असल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले होते. नातेवाईकांना जसे दु:ख आहे. तसेच, दु:ख आम्हांला आहे. त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो. एनडीआरएफचे पथकानेही ही मोहीम काळजीपूर्वक राबविली. आमच्यासाठी प्रत्येक जीव महत्त्वाच होता. त्यामुळे ही मोहीम अत्यंत काळजीपूर्वक राबविली गेली.
त्रयस्थ यंत्रणेमार्फत केली जाणार चौकशी
मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील बचाव कार्य संपल्यानंतर त्या घटनेची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी केली जाणार आहे. यात कोणी दोषी असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. डेपोतील त्या प्रशासकीय इमारतीचा पाया, भिंती, खांब तसेच, कचरा डेपो आणि इमारतीमध्ये योग्य अंतर होते का, कचराचे डोंगर अधिक उंचीचे होते का, त्याच नियमांचे उल्लंघन झाले आहे का, आदींची चौकशीही केली जाणार आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.