

लोणावळा: लोणावळा शहर हे राज्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून, मुंबई व पुणे या दोन महानगरांच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले आहे. राज्यात सर्वत्र उन्हाची तीवता वाढलेली असताना लोणावळ्यातील सकाळ व संध्याकाळचे वातावरण मात्र थंड व आल्हाददायक असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत; परंतु यामुळे शहरात वाहतूककोंडी होत आहे.
स्थानिकांना मिळतोय रोजगार
शहरातील लायन्स पॉईंट, भुशी धरण, खंडाळ्यातील सनसेट पॉईंट, खंडाळा बोटिंग तलाव, अमृतांजन पुलासमोरून दिसणारा ड्युक्स नोज पॉईंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला आणि पवना धरण परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.
पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक हॉटेल्स, रिसॉट्र्स, चिक्की विक्रेते, ढाबे व लहान व्यावसायिकांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली असून, शहराच्या अर्थकारणाला मोठी चालना मिळत आहे. दुसरीकडे, वाहनांची वाढलेली संख्या लक्षात घेता मुंबईड्ढपुणे राष्ट्रीय महामार्गावर तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
सुटीच्या दिवशी ही परिस्थिती अधिक तीव होत असून, नागरिक व पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शनिवार व रविवारी तसेच सलग सुट्यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊ लागली आहे.
वाहतूक व्यवस्थेचे नियोजनाची गरज
मागील अनेक वर्षांपासून ही समस्या वाढत असल्यामुळे पर्यटनवृद्धीसोबत वाहतूक व्यवस्थेचे प्रभावी नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरामधून जाणाऱ्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे शासनाने रुंदीकरण लवकरात लवकर करावे, अशी मागणीही येथील नागरिक व्यक्त करत आहे.