

सांगवी: पिण्याच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी नव्या सांगवीच्या धर्तीवर जुनी सांगवीतही 'व्हर्टिकल शाफ्ट पंपिंग सिस्टीम' तातडीने सुरू करण्याची जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे. जुनी सांगवी हा पाण्याचा 'टेल एंड' (शेवटचा भाग) असल्यामुळे येथे पाणीपुरवठ्याचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे. जय मल्हारनगर, ममतानगर, बुद्ध सोसायटी, मधुबन असो किंवा संगमनगर, प्रियदर्शनीनगर, साई स्नेह पार्क आणि जयराज पार्क यांसारख्या भागांमध्ये पाण्याचा प्रचंड प्रश्न आहे. या संपूर्ण परिसराची भौगोलिक रचना पाहता, येथील बहुतांश सोसायट्या आणि वास्तू या उंचवट्यावर वसलेल्या आहेत.
नव्या सांगवीत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुमारे एक कोटी रुपये खर्च करून व्हर्टिकल शाफ्टची प्रक्रिया राबवली आणि प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी ट्रायलही घेतली जात आहे. मग असाच प्रभावी उपाय जुन्या सांगवीसाठी का राबवला जात नाही? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. त्यामुळे प्रशासनाने दुजाभाव न करता जुन्या सांगवीतील उंचवट्यावरील भाग आणि 'टेल एंड'चा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी तातडीने येथे 'व्हर्टिकल शाफ्ट' प्रकल्प उभा करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
सुविधा न दिल्यास आंदोलनाचा इशारा
शहरातरात एकीकडे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून लाखो-कोटी रुपये खर्च करून नव्या सांगवीत 'व्हर्टिकल शाफ्ट'सारखे आधुनिक तंत्रज्ञान आणले जात आहे. ज्याची ट्रायलही सुरू आहे. मग जुन्या सांगवीत हा प्रकल्प का राबविला जात नाही. संगमनगर, प्रियदर्शनीनगर, साई स्नेह पार्क असो वा जयराज पार्क येथे पाण्याची सर्वात मोठी समस्या आहे. प्रशासनाने हा पक्षपात त्वरित थांबवावा आणि जुन्या सांगवीतही हा व्हर्टिकल शाफ्ट प्रकल्प उभा करून येथील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल, अशी भावना सांगवीकरांनी व्यक्त केली आहे.
व्हर्टिकल शाफ्टमुळे जुन्या सांगवीला कसा फायदा होईल?
जुन्या सांगवीतील ज्या सोसायट्या उंच भागावर आहेत, तिथे गुरुत्वाकर्षणामुळे पाण्याचा फोर्स फार कमी होतो किंवा पाणी पोहोचतच नाही. अशा वेळी व्हर्टिकल शाफ्टमध्ये बसवलेले व्हर्टिकल टर्बाइन पंप प्रचंड दाब निर्माण करून पाणी सरळ वरच्या दिशेने ढकलतात, ज्यामुळे उंचवट्यावरील सोसायट्यांच्या टाक्यांमध्ये पाणी सहज पोहोचू शकते.
'टेल एंड'चा शाप मिटणार
जुनी सांगवी हा पाण्याचा टेल एंड भाग असल्यामुळे नेहमीच पाण्याचा तुटवडा जाणवतो. ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा पाणी उशिरा येते आणि लवकर बंद होते. व्हर्टिकल शाफ्टमुळे पाण्याचा दाब कायम राहून शेवटच्या टोकापर्यंत पाणी सुरळीत पोहोचण्यास मदत होईल.
ज्येष्ठ नागरिकांची त्रासातून सुटका
या भागांत अनेक ज्येष्ठ नागरिक राहतात, ज्यांची मुले-मुली नोकरीनिमित्त परदेशात आहेत. घरातील वृद्ध आई-वडिलांना पाण्याच्या वेळेसाठी तासनतास धावपळ करावी लागते. हा प्रकल्प झाल्यास पाण्याचा त्रास संपून त्यांची मोठी सोय होईल.
फक्त नव्या सांगवीतच पाणी सुरळीत चालले आहे का? मग आमच्या जुन्या सांगवीत पाण्याची एवढी मोठी समस्या असताना येथे हा व्हर्टिकल शाफ्ट का बनवला जात नाही? आमची घरे उंचवट्यावर असल्यामुळे आणि हा भाग 'टेल एंड'ला येत असल्यामुळे आम्हाला कधीही पुरेसे पाणी मिळत नाही. उन्हाळा असो वा पावसाळा, आम्हाला पाण्यासाठी रोज संघर्ष करावा लागतो. जर ती सिस्टीम नव्या सांगवीत होऊ शकते, तर आमच्याकडे का नको? आमच्या भागातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची होणारी ही फरफट थांबवण्यासाठी जुन्या सांगवीतही तातडीने ही सिस्टीम सुरू झालीच पाहिजे.
भावना जगताप, स्थानिक महिला.