

कामशेत: मावळमध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहे. निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली असून, या काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता कामशेत पोलिस प्रशासनाने कंबर कसली असून, सर्व पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचे दिसत आहे.
कामशेत पोलिस प्रशासनाने काळ्या काचा असलेल्या व काळ्या फिल्म लावलेल्या चारचाकी गाड्यांवर धडक कारवाई करीत चारचाकी गाड्यांची तपासणी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस प्रशासनामार्फत विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
विशेष म्हणजे अशा काळ्या काचा असलेल्या गाडीमध्ये कोण आहे ते कळत नाही. आरटीओ विभागाने अशा वाहनांवर व काळ्या काचांवर तसेच डार्क काळी फिल्म लावण्यावर सक्त मनाई आहे. काही चारचाकी मालक कायद्याचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. अशा बेजाबदार वाहनचालकांवर पोलिस प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.
कामशेत शहर हे अतिसंवेदनशील क्रमवारीत येते. यामुळे पोलिस प्रशासनाने अवैध गतिविधीवर बारीक लक्ष ठेवल्याचे दिसून येत आहे. मावळात व कामशेत शहरात इतर मार्गाने अमली पदार्थांचे साठे येऊ नयेत, याकरिता विशेष मोहीम राबविली जात आहे. कामशेत शहरामधून नाणे मावळ, पवनमावळ, आंदरमावळ, पुणे व मुंबई या ठिकाणांकडे जाण्यासाठी मार्ग असल्याने शहरात गाड्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यात कोणताही गैरप्रकार होऊ नये, याकरिता प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे.
निवडणुका शांततेत पार पाडण्याकरिता पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी विशेष मोहीम राबविली आहे. शहरात येणाऱ्या अनोळखी गाड्यांची तपासणी सुरू आहे. तसेच काळ्या व गडद रंगाच्या फिल्म असलेल्या गाड्या थांबवून तपासणी केली जात आहे. स्थानिक नागरिकांनीदेखील आपल्या परिसरात जर अशी वाहने आढळून आली, तर पोलिस यंत्रणेशी संपर्क साधून त्याची माहिती द्यावी.
संदीप शिंदे, पोलिस हवालदार