

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते दापोडी मेट्रो धावत आहे. पिंपरी ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. तर, पीएमआरडीच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गात वाकड हे स्टेशन महापालिका हद्दीत येते. या अकरा मेट्रो स्टेशनपासून 500 मीटर परिसराचा महापालिका स्वतंत्रपणे विकास करणार आहे. त्यासाठी महापालिका स्वतंत्रपणे लोकल एरिया प्लान (एलएपी) तयार करीत आहे. त्याद्वारे त्या भागांतील निवासी, व्यावसायिक इमारत तसेच, इमारत पुनर्निर्माणासाठी बांधकाम परवानगीत बदल केला जाणार आहे. तेथील वाहतूक व्यवस्था, पार्किंग आदी सेवा-सुविधांना प्राधान्य दिले जाणार आहे.(Latest Pimpri chinchwad News)
शहरात मेट्रो मार्गिकेचे काम सन 2016 पासून सुरू झाले. मेट्रो 6 मार्च 2022 पासून धावत आहे. शहरातील पिंपरी, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी व दापोडी हे मेट्रो सहा स्टेशन सुरू आहेत. तसेच, पिंपरी ते निगडी या विस्तारीत मार्गावर चिंचवड स्टेशन, आकुर्डी, टिळक चौक व भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक असे चार स्टेशन उभारण्यात येणार आहेत. पीएमआरडीच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गात वाकड स्टेशन आहे. तो भाग महापालिका हद्दीत येतो. या अशा एकूण 11 मेट्रो स्टेशन परिसराचा महापालिका विकास करणार आहे. स्टेशनपासून 500 मीटर परिघातील भागास ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट झोन (टीडीओ झोन) म्हणतात.
शासनाच्या युडीसीपीआरच्या नव्या निमवालीनुसार टीडीओ झोनचा एलएपी आराखडा महापालिका करणार आहे. त्यानुसार त्या भागांचा विकास केला जाणार आहे. आराखडा बनविण्याचे काम गुजरातच्या एचसीपी डिजाईन, प्लानिंग ॲण्ड मॅनेजमेंट प्रा. लि. या एजन्सीला देण्यात आले आहे. या एजन्सीने पवना, मुळा व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे. तसेच, महापालिकेच्या सुधारित विकास योजना आराखडा (डीपी प्लान) याच एजन्सीने तयार केला आहे. एलएपीसाठी महापालिका त्या एजन्सीला प्रत्येक हेक्टरसाठी 19 हजार 950 रूपये शुल्क देणार आहे.
ती एजन्सी 11 मेट्रो स्टेशनच्या भागांचा सर्व्हे करणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, ये-जा करणे सुलभ व सुरक्षित असेल. त्यासाठी नवीन आरक्षणे टाकण्यात येणार आहेत. नागरिकांचे राहणीमान उंचावेल, असा आराखडा तयार केला जाणार आहे. टीडीओ झोनमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींसाठी पालिकेची विशेष बांधकाम परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच, इमारतीसमोर 9 मीटर जागा पार्किंगसाठी सोडावी लागणार आहे. आराखडा तयार करण्यासाठी 9 महिन्यांची मुदत आहे. त्यावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर तो राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर पालिकेकडून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी दीड वर्षाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पिंपरी, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी व दापोडी हे मेट्रो सहा स्टेशनवरून मेट्रो धावत आहे. पिंपरी ते निगडी या विस्तारीत मेट्रो मार्गावर चिंचवड स्टेशन, आकुर्डी, टिळक चौक व भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक असे चार स्टेशन असणार आहेत. पीएमआरडीच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गात वाकड स्टेशन आहे. असे एकूण 11 मेट्रो स्टेशन परिसराचा विकास होणार आहे.
महापालिकेने टीडीओ झोनचा नकाशा तयार करून तो फेबुवारी 2024 ला राज्य शासनाकडे मंजुरीस पाठविला आहे. अद्याप, त्यास मंजुरी न मिळाल्याने ते काम रखडले आहे. नव्याने तयार करण्यात येणाऱ्या एलएपीला राज्य शासनाकडून लवकर मंजुरी मिळण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे टीडीओ झोनचा विकास लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लोकल एरिया प्लान (एएलपी) तयार करण्यासाठी स्थापत्य विभागाने कोटेशन निविदा काढली होती. त्यात दोन एजन्सीने सहभाग घेतला. एक एजन्सी अपात्र ठरली. पात्र, एचसीपी डिजाईन, प्लानिंग ॲण्ड मॅनेजमेंट प्रा. लि. या एजन्सीला काम देण्यास आयुक्तांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे. त्या एजन्सीला 19 हजार 950 रूपये प्रती हेक्टर दराने शुल्क देण्यात येणार आहे. आराखडा तयार करण्याचे काम 9 महिन्यात पूर्ण केले जाणार आहे. त्याला राज्य शासनाची मान्यता घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जााईल, असे महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.
शहरात पिंपरी ते फुगेवाडी अशी मेट्रो 6 मार्च 2022 ला तर, फुगेवाडी ते डिस्ट्रीक कोर्ट अशी मेट्रो 1 ऑगस्ट 2023 पासून धावण्यास सुरूवात झाली. तेथून पुढे स्वारगेटपर्यंत मेट्रो 29 सप्टेंबर 2024 पासून धावत आहे. या प्रकल्पासाठी सन 2026 पासून शहरात काम सुरू झाले. मेट्रो सुरू होऊन चार वर्षे झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून टीडिओ झोनचा विकास करण्यात येत आहे. या चार वर्षांत टीडीओ झोनमध्ये अनेक नव्या इमारती तयार झाल्या आहेत. अनेक गगनचुंबी गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. टीडीओ झोनचा आराखडा तयार होण्यास आणखी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. असे तब्बल 5 वर्षाचा कालावधी महापालिकेने वाया घालविला आहे. त्यामुळे टीडीओ झोनचा विकास होणार की वाहतूक कोंडीत भर पडणार, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
शहराचे डीपी तयार करण्याचे काम महापालिकेच्या नगर रचना विभाागाकडून करण्यात येते; मात्र त्या विभागाने टीडीओ झोन विकसित करण्याबाबत उदासीनता होती. त्यामुळे ते काम अनेक वर्षे धूळ खात पडले होते. तसेच, महापालिकेच्या सुधारित विकास योजना आराखड्यात टीडीओ झोनचा समावेश दर्शविण्यात आलेला नाही. त्यामुळे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांनी ते काम स्थापत्य विभागाकडे सोपवले आहे. टीडीओ प्लानचे काम नगर रचना विभागाने वेळेत न केल्याने त्यास विलंब झाला असून, डीपीत टीडीओ झोन न दाखविल्याने महापालिकेस अतिरिक्त खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.