

पिंपरी: एकीकडे भारत जगाला योग, आयुर्वेद आणि मसाल्यांची ओळख करून देत असताना, दुसरीकडे आपल्याच देशातील तरुण पिढी मात्र, भारतीय खाद्य संस्कृतीपासून दुरावत चालली आहे. थाळी, पुरणपोळी, बाजरीची भाकरी, लोणचं-चटणी यांची जागा आता बर्गर, पिझ्झा, मोमोज आणि कोल्ड ड्रिंक्सने घेतली आहे.
ही बदलती जीवनशैली केवळ चवीचा प्रश्न राहिलेला नाही, तर आरोग्य आणि सांस्कृतिक ओळखीसाठीही चिंतेचा विषय बनली आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण आणि विविध बाजार संशोधनानुसार, गेल्या १० वर्षात शहरातील १८ ते ३० वयोगटातील ६८ टक्के तरुण आठवड्यातून किमान ३ वेळा बाहेरचे फास्ट फूड खातात.
त्यापैकी ४२ टक्के तरुणांनी सांगितले की, घरचे जेवण कंटाळवाणे वाटते. झोमॅटो - स्विगीसारख्या फूड डिलिव्हरी अॅप्सवर २०२५ मध्ये बर्गर, पिझ्झा आणि चायनीज ऑर्डरमध्ये ३५ टक्के वाढ झाली. याउलट थाळी, डाळ-भात, भाजी-भाकरीच्या ऑर्डरमध्ये केवळ ८ टक्के वाढ नोंदवली गेली.
फास्ट फूडकडे वळण्याची कारणे :
नोकरी-शिक्षणामुळे वेळेचा अभाव. दहा मिनिटात डिलिव्हरी मिळणारे जेवण सोयीचे वाटते. इन्स्टाग्राम रील्स, यूट्यूबवर फूड ब्लॉगर्स सतत पाश्चात्य आणि फ्यूजन फूड दाखवतात. ट्रेंडी दिसण्यासाठी तरुणही तेच फॉलो करतात. चटपटीत, तिखट चवीच्या जंक फूडची लहानपणापासून सवय. मित्रांसोबत कॅफेमध्ये जाऊन कॉफी-पिझ्झा खाणे हे एक प्रकारे स्टेटस बनले आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शाळा-कॉलेजमध्ये फूड लिटरसी (खाद्य संस्कृती) शिकवली पाहिजे. पालकांनी मुलांना लहानपणापासून स्वयंपाकात सहभागी करून घेतले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे, भारतीय जेवणाला जुने न मानता स्मार्ट आणि हेल्दी म्हणून ब्रँडिंग करणे गरजेचे आहे.
पिंपरीतील महाविद्यालयीन विद्यार्थी रोहन पाटील म्हणतो की, आठवड्यातून चार दिवस बाहेरच खातो. आईचा स्वयंपाक आठवड्यातून एकदाच मिळतो. घरचं जेवण हेल्दी आहे हे माहिती आहे, पण वेळेमुळे हे जमत नाही.
परिणाम काय होऊ शकतो ?
आरोग्यावर परिणाम : लठ्ठपणा, पीसीओडी, मधुमेह, पोटाचे विकार २० - २५ वयातच दिसू लागले आहेत.
शेतीवर परिणाम : बाजरी, ज्वारी, नाचणीसारख्या भरडधान्यांची मागणी कमी झाली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत आहे.
सांस्कृतिक नुकसान : सण-उत्सवातील पारंपरिक पदार्थही आता फक्त वर्षातून एकदा उरले आहेत.
पुन्हा मिलेट्स (भरडधान्य)चा ट्रेंड
गेल्या २ - ३ वर्षांपासून मिलेट्स म्हणजे भरडधान्यांचा ट्रेंड परत येत आहे. अनेक स्टार्टअप आता हेल्दी थाळी, मिलेट पिझ्झा, राजगिरा बर्गर असे फ्यूजन पदार्थ बाजारात आणत आहेत. सोशल मीडियावर हे ट्रेंड जोरात सुरू आहेत.
भारतीय जेवण साध्या पद्धतीने सादर केले जात आहे. क्विनोआऐवजी राजगिरा, मैदाऐवजी ज्वारी वापरली जाते. यातून चव आणि आरोग्य दोन्ही मिळते. मात्र, हे मिलेट्स धान्य महाग तसेच सर्वत्र उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना याचे फायदे माहिती असून उपयोग करता येत नाही.
आहारतज्ज्ञ म्हणतात की, भारतीय जेवण हे संतुलित आहाराचे उदाहरण आहे. डाळी, धान्य, भाज्या, दही, तूप यात प्रोटीन, फायबर आणि प्रोबायोटिक्स असतात. याउलट पिझ्झा-बर्गरमध्ये मैदा, साखर आणि ट्रान्सफॅट जास्त. यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोग तरुण वयातच वाढत आहेत. प्रत्येक प्रदेशाची स्वतःची खाद्य ओळख आहे. महाराष्ट्राची झुणका-भाकरी, पंजाबचा सरसों का साग, गुजरातचा ढोकळा. हे केवळ पदार्थ नाहीत, नाही तर ती खाद्यसंस्कृती आहे. शेवटी जेवण ही फक्त भूक भागवण्याची गोष्ट नाही, तर ती आपली ओळख आहे.
- पूजा सोनावणे , आहारतज्ज्ञ, वायसीएम रुग्णालय