

पुणे: परदेशात गडगंज पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून पुण्यातील एका कंपनीने नागपूरच्या विवाहित तरुणीची पोर्तुगालमध्ये वेश्याव्यवसायासाठी विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, प्रसंगावधान दाखवत तिने धाडसाने सुटका करून घेत दिल्ली गाठली. तिच्यावर ओढवलेल्या कठीण प्रसंगाची कहाणी अंगावर काटा आणणारी आहे.
विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी प्रतिमा भाटी, अमितकुमार झा, अझहर शेख, कपिल मिश्रा तसेच पोर्तुगालमधील अनिलकुमार, वामधस, चैतन्य आणि हिम्मतसिंग अशा आठ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, गुन्हेगारी कट, धमकी, मानवी शोषणासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
नागपूरच्या २८ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीतून नोकरीच्या आमिषाने परदेशात पाठविणाऱ्या एजंटांचे मोठे रॅकेटच समोर आले आहे. तिने डिसेंबर २०२५ मध्ये इन्स्टाग्रामवर 'वुई मायग्रेट' या कंपनीची जाहिरात पाहिली. या कंपनीने पोर्तुगाल, स्पेन, नेदरलँड्ससह विविध देशांमध्ये सुपरमार्केट, चॉकलेट कंपन्या आणि इतर विविध कंपन्यांमध्ये लाखो रुपयांचे वेतन असलेली नोकरी मिळवून देतो, असे सांगितले होते.
त्यासाठी तिला विमाननगर येथील कार्यालयात बोलावून परदेशात काम करणाऱ्या काही जणांशी व्हिडीओ कॉलवरून बोलणे करून दिले. तिचा विश्वास संपादन केल्यानंतर व्हिसा, वर्क परमिट, तिकीट, विमा आणि इतर खर्चाच्या नावाखाली टप्प्याटप्प्याने तिच्याकडून या कंपनीने आठ लाख रुपये घेतले.
स्पेनमध्ये पोहोचताच छळ
सर्व सोपस्कार पूर्ण होताच मे २०२६ मध्ये या विवाहितेला स्पेनमध्ये पाठविण्यात आले. तेथे कंपनीच्या काही व्यक्तींनी तिची भेट घेतली. स्पेनहून पोर्तुगालला नेल्यावर एका वसतिगृहात तिला रात्र काढण्यास भाग पाडण्यात आले.
दुसऱ्या दिवशी तिला एका अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. व तिचा पासपोर्ट काढून घेऊन दोन दिवस तिला एका खोलीत डांबण्यात आले. या काळात तिला पुरेसे अन्न-पाणीही दिले गेले नाही. त्यानंतर पासपोर्टसाठी तिच्याकडून ४० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. अखेर भीतीपोटी तिने त्यांना स्वतःजवळील ४०० युरो देऊन पासपोर्ट परत मिळविला.
नोकरी ऐवजी विक्री; अन् वेश्याव्यवसायासाठी दबाव...
तिसऱ्या दिवशी तिला पोर्तुगालमधील एका गावात नेण्यात आले. व तेथील एका दुकानात सकाळी ८ ते रात्री ११ पर्यंत साफसफाईच्या कामासाठी नोकरीवर ठेवण्यात आले. याबाबत तिने भारतातील एजंटकडे तक्रार केली असता, "वर्क परमिट मिळेपर्यंत असे काम करावे लागेल," असे सांगून तिची समजूत काढली गेली. काही दिवसांनी या दुकानाच्या मालकाने तिला त्याच्या घरी कामासाठी पाठविले. त्यावेळी तिने पुन्हा एजंटशी संपर्क साधला. मात्र एजंटनेच "मालकाला सर्व प्रकारे खूष ठेवावे लागेल," असे सांगितले.
मालकाला हे समजल्यानंतर त्याने, "मी तुला प्रतिमा भाटी आणि तिच्या साथीदारांकडून विकत घेतले आहे. तुला नोकरीसाठी नाही, तर मी सांगेल ते काम करण्यासाठी येथे आणले आहे," असे सांगितले. तिच्यासोबत तेथे काम करणाऱ्या इतर दोन भारतीय तरुणींनीही तिला, मालक सांगेल त्या व्यक्तींसोबत शय्यासोबत करावी लागते, असे सांगितल्याने ती हादरून गेली.
धाडसी सुटका
आपण अशा घाणेरड्या दलदलीत अडकलो हे समजल्यानंतर स्वतःला सावरत तिने पतीशी संपर्क साधून आपल्याला ओढवलेल्या जीवघेण्या प्रसंगाची कल्पना दिली. २९ जून २०२६ रोजीच्या पहाटे तिने मालकाच्या तावडीतून शिताफीने सुटका करून घेत बसने दुसरे शहर गाठले. संपूर्ण रात्र तिने बसस्थानकावर बसून काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती एका हॉटेलमध्ये लपून राहिली. त्यानंतर विमानाने दोहा मार्गे तिने दिल्ली गाठली. दिल्लीत पोहोचताच तिने पतीला बोलावून घेतले. मानसिक धक्क्यामुळे त्यांनी नागपूर गाठले.
या प्रकारानंतर कंपनीने तिच्याकडे पुन्हा तीन लाख रुपयांची मागणी केली. व ते न दिल्यास पतीला अडकविण्याची तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली. मग धाडस एकवटून भाजप युवा मोर्चाचे दुश्यंत मोहोळ यांच्या मदतीने तिने पोलिसांकडे धाव घेतली. विमानतळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविला असून तेथील पोलीस निरीक्षक प्रशांत माने पुढील तपास करीत आहेत.