

पिंपरी: हिंजवडी आयटी पार्कमध्ये बुधवारी (दि. ५) भारत आणि अमेरिकेच्या विशेष सुरक्षा दलांचा संयुक्त सुरक्षा सराव पार पडला. अमेरिकेच्या १७ विशेष कमांडोंसह भारताच्या नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या (एनएसजी) १०० हून अधिक 'ब्लॅक कॅट' कमांडोंनी या पाच तासांच्या मॉकड्रिलमध्ये सहभाग घेतला. जागतिक स्तरावरील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आयोजित या सरावात दहशतवादी हल्ला, बंधक सुटका आणि संवेदनशील परिसर सुरक्षित करण्यासारख्या परिस्थितींचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
सायंकाळी चारच्या सुमारास माण-हिंजवडी परिसरातील एका नामांकित आयटी कंपनीच्या आवारात सायरन वाजवत विशेष सुरक्षा दलाचा ताफा दाखल झाला. अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज एनएसजीचे 'ब्लॅक कॅट' कमांडो आणि अमेरिकन विशेष कमांडो वाहनांतून उतरून नियोजित ठिकाणी पोहोचले. सुरुवातीला प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्याचा समज झाल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, हा पूर्वनियोजित सुरक्षा सराव असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
सायंकाळी ४ ते रात्री ९ या कालावधीत झालेल्या या संयुक्त मॉकड्रिलमध्ये संभाव्य दहशतवादी हल्ला, बंधकांची सुटका, संवेदनशील इमारतीचे संरक्षण, संशयितांचा शोध, परिसर ताब्यात घेणे, आपत्कालीन प्रतिसाद आणि विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय अशा विविध परिस्थिती निर्माण करण्यात आल्या. त्यानुसार, भारतीय आणि अमेरिकन कमांडोंनी संयुक्तरीत्या कारवाईचे प्रात्यक्षिक सादर केले.
संपूर्ण सरावादरम्यान कंपनी परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मुख्य प्रवेशद्वारांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिसरातील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. अत्याधुनिक शस्त्रे, विशेष उपकरणे आणि आधुनिक युद्धतंत्राचा वापर करून कमांडोंनी वेग, अचूकता आणि समन्वयाचे दर्शन घडविले.
या सरावामागील उद्देश कोणत्याही मोठ्या आपत्कालीन किंवा दहशतवादी परिस्थितीत भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांमधील समन्वय अधिक प्रभावी करणे, तसेच आयटी हबसारख्या संवेदनशील परिसरातील प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम बनविणे हा होता.
आयटी हबमध्ये काही काळ संभ्रम
अचानक मोठ्या प्रमाणावर विशेष सुरक्षा दलाचा ताफा आणि सशस्त्र कमांडो पाहून अनेक कर्मचारी व नागरिक काही काळ गोंधळले. काहींनी मोबाईलवर संपूर्ण घडामोडींचे चित्रीकरण केले, तर काहींनी काय सुरू आहे, याची माहिती घेण्यासाठी गर्दी केली. हा केवळ सुरक्षा सराव असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वातावरण पूर्ववत झाले.
भारतीय-अमेरिकन सुरक्षा समन्वयाची झलक
या मॉकड्रिलमध्ये अमेरिकेच्या १७ विशेष कमांडोंनी एनएसजीच्या १०० हून अधिक 'ब्लॅक कॅट' कमांडोंसोबत संयुक्त सहभाग नोंदविला. विविध काल्पनिक दहशतवादविरोधी परिस्थितींमध्ये दोन्ही देशांच्या विशेष दलांनी समन्वयाने कारवाईचे प्रात्यक्षिक सादर केले. अशा प्रकारच्या संयुक्त सरावातून परस्पर अनुभवांची देवाणघेवाण, प्रतिसाद क्षमता आणि समन्वय अधिक बळकट करण्यावर भर दिला जातो.
आयटी हबची सुरक्षा तपासली
हिंजवडी आयटी पार्कमध्ये देश-विदेशातील नामांकित आयटी कंपन्यांची कार्यालये असून, हजारो भारतीय आणि परदेशी कर्मचारी येथे कार्यरत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर संवेदनशील मानला जातो. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांचा प्रतिसाद, समन्वय आणि कार्यक्षमता तपासण्यासाठी अशा प्रकारचे मॉकड्रिल नियमितपणे आयोजित केले जातात.