

वल्लभनगर: पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे तुडुंब भरून वाहत असतानाही कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव अद्यापही बंद असल्याने जलतरणपटू क्रीडाप्रेमी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पाणीकपातीच्या निर्णयानंतर जून महिन्यात बंद करण्यात आलेला हा तलाव जुलै आणि ऑगस्टमध्येही सुरू न झाल्याने नियमित सराव करणाऱ्यांसह वर्षभराचा पास काढलेल्या नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
जून महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने महापालिकेने शहरात १५ टक्के पाणीकपात लागू करत सर्व महापालिका जलतरण तलाव तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे तलाव पुन्हा सुरू होतील, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, अद्यापही तलाव बंदच असल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
जलतरणपटूंचा नियमित सराव खंडित
या निर्णयाचा सर्वाधिक फटका राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांची तयारी करणाऱ्या जलतरणपटूंना बसत आहे. नियमित सराव खंडित झाल्याने त्यांच्या कामगिरीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, आरोग्यासाठी नियमित पोहणारे ज्येष्ठ नागरिक, व्यायामप्रेमी आणि लहान मुलांनाही याचा मोठा फटका बसला आहे. अनेकांना खासगी जलतरण तलावांचा पर्याय स्वीकारावा लागत असून, त्यासाठी अतिरिक्त आर्थिक खर्च करावा लागत आहे.
पासधारकांचे नुकसान
मोबाईलच्या वाढत्या वापरापासून मुलांना दूर ठेवण्यासाठी जलतरण हा प्रभावी व्यायाम मानला जातो. तसेच, पोहण्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, स्नायू बळकट होतात, वजन नियंत्रणात राहते आणि मानसिक तणाव कमी होतो. त्यामुळे तलाव बंद राहिल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे अनेक नागरिकांनी वर्षभरासाठी जलतरण तलावाचे पास काढले आहेत. मात्र, जून, जुलै आणि ऑगस्ट असे सलग तीन महिने तलाव बंद राहिल्याने त्यांना पासचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे बंद कालावधीची मुदत वाढवून देण्यात यावी किंवा पर्यायी दिलासा द्यावा, अशी मागणी पासधारकांकडून केली जात आहे.
पाणीकपात अद्यापही १५ टक्के सुरू आहे. ती लागू केल्यानंतर जलतरण तलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अद्याप पाणीकपात रद्द झालेली नसल्याने तो निर्णय कायम आहे. जोपर्यंत ती रद्द होत नाही, तोपर्यंत जलतरण तलाव सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेणे शक्य नाही.
पंकज पाटील, उपायुक्त, क्रीडा विभाग, महापालिका
आम्ही वर्षभरासाठी जलतरण तलावाचे पास काढले आहेत. मात्र, जून, जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिने तलाव बंद असल्याने नियमित पोहता आले नाही. आमचे पैसेही वाया गेले आणि आरोग्यासाठी सुरू ठेवलेला व्यायामही बंद झाला. महापालिकेने बंद कालावधीची भरपाई करून तलाव तातडीने सुरू करावा.
वसंत लोखंडे, ज्येष्ठ नागरिक पासधारक, पिंपळे गुरव