

पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने (पीएमआरडीए) श्रीक्षेत्र देहू ते भंडारा डोंगर जोडणाऱ्या देहू-येलवाडी रस्त्याच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटवण्यासाठी पीएमआरडीएने विशेष मोहीम हाती घेत धडक कारवाई सुरू केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 55 ते येलवाडी आणि देहू परिसराला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात कच्ची व पक्की अतिक्रमणे झाली होती. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले होते. रस्ते विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी 18 मे रोजी अतिक्रमण हटविण्याबाबत पत्र दिल्यानंतर पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने तातडीने कारवाई सुरू केली.
उपायुक्त तथा तहसीलदार आशा होळकर यांनी विशेष आदेश जारी करून शाखा अभियंत्यांची पथके नियुक्त केली आहेत. ही मोहीम महानगर आयुक्तांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. सहआयुक्त (प्रभारी) हिंमत खराडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार रवींद्र रांजणे आणि अभियंत्यांची पथकांनी प्रत्यक्ष कारवाई केली.
दरवर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी देहूत येतात. तसेच, भंडारा डोंगरावर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे या मार्गावर कायम वाहतूककोंडी निर्माण होत होती. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी दीर्घकाळ प्रलंबित होती. पीएमआरडीएच्या 11 व्या सभेत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. आता अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेमुळे रस्त्याच्याकामाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला वेग येणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
2.335 किलोमीटर लांबीचा रस्ता
30 मीटर रुंदीचा सहापदरी सिमेंट काँक्रीट मार्ग
दोन्ही बाजूंना सुसज्ज पदपथ
प्रकल्पासाठी 125 कोटींचा निधी मंजूर
कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश जारी