

संतोष शिंदे
पिंपरी: तात्काळ कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या बनावट लोन ॲप्सच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत आहे. सोशल मीडियावर इन्स्टंट लोन, नो डॉक्युमेंट लोन, फाइव्ह मिनिट लोन अशा जाहिराती दाखवून तरुणांना जाळ्यात ओढले जात आहे. कर्ज मंजूर झाल्यानंतर तरुणांकडून अवाजवी व्याज, शुल्क आणि अतिरिक्त पैशांची मागणी केली जात असून, पैसे न दिल्यास त्यांना मानसिक त्रास देत बदनामी करण्याची धमकी दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर सायबर विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
फोटो मॉर्फिंग बनतेय मोठे शस्त्र
फेक लोन ॲपद्वारे फसवणूक करणारे आरोपी आता केवळ पैशांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. मोबाईलमधील फोटो, संपर्क क्रमांक आणि वैयक्तिक माहिती मिळवल्यानंतर संबंधितांचे फोटो मॉर्फ करून त्याचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी केला जात आहे. विशेषतः महिलांना लक्ष्य करून त्यांच्या संपर्क यादीतील नातेवाईकांना आणि मित्रांना अश्लील स्वरूपातील फोटो पाठवण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे अनेकजण भीतीपोटी पैसे भरतात. सायबर तज्ज्ञांच्या मते, मोबाईलमधील परवानग्यांकडे दुर्लक्ष करणे ही या फसवणुकीची सर्वात मोठी कमकुवत बाजू ठरत आहे.
सायबर विभागाचे आवाहन
नागरिकांनी अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. एपीके फाईल डाउनलोड टाळावी. तसेच, कोणत्याही ॲपला अनावश्यक परवानग्या देऊ नयेत. फसवणूक झाल्यास तातडीने 1930 हेल्पलाईन किंवा ... या संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन सायबर विभागाकडून करण्यात आले आहे.
आरबीआय मान्यता संस्थेचे ॲप वापरा
पैसे न भरल्यास मोबाईलमधील फोटो मॉर्फ करून ते नातेवाईक, मित्र आणि संपर्क यादीतील व्यक्तींना व्हॉट्स ॲपवर पाठवण्याची धमकी दिली जाते. काही प्रकरणांमध्ये महिलांना अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याच्याही तक्रारी समोर आल्या आहेत. यातील महत्त्वाची बाब म्हणजे, अनेक बनावट लोन ॲप्स अधिकृत बँका किंवा एनबीएफसी कंपन्यांच्या नावासारखी नावे वापरतात. त्यामुळे सामान्य नागरिक सहज विश्वास ठेवतात. काही ॲप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध असले तरी ते अधिकृत असतीलच असे नाही. त्यामुळे कोणतेही लोन ॲप डाउनलोड करण्यापूर्वी ते आरबीआय मान्यताप्राप्त संस्था किंवा अधिकृत वित्तीय कंपनीशी संबंधित आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे.
अटी वाचूनच परवानग्यांना मंजुरी द्या
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोशल मीडियावर आकर्षक जाहिराती टाकून नागरिकांना लिंक पाठवतात. या लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईलमध्ये एपीके फाईलच्या स्वरूपातील लोन ॲप डाउनलोड केले जाते. हे ॲप इन्स्टॉल करताना संपर्क क्रमांक, फोटो गॅलरी, मेसेज, लोकेशन, कॉल लॉग यांसारख्या विविध परवानग्या घेतल्या जातात. अनेक नागरिक अटी न वाचताच सर्व परवानग्या मंजूर करतात आणि त्याचाच फायदा सायबर चोरटे घेतात. यानंतर आरोपी संबंधित नागरिकांच्या मोबाईलमधील माहिती मिळवतात. सुरुवातीला खात्यात कमी रक्कम जमा करून कर्ज मंजूर झाल्याचे दाखवले जाते. त्यानंतर काही दिवसांतच व्याज, दंड आणि प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली जादा रकमेची मागणी सुरू होते.
काय काळजी घ्याल?
अनोळखी लिंकवर क्लिक करू नका
एपीके फाईलद्वारे ॲप डाउनलोड टाळा
ॲपला संपर्क, फोटो, लोकेशन परवानगी देताना काळजी घ्या
लोन ॲपचे रिव्ह्यू आणि कमेंट्स तपासा
आरबीआय मान्यता असलेल्या संस्थेचेच ॲप वापरा
कमी व्याजदर आणि तात्काळ कर्जाच्या आमिषाला बळी पडू नका
फसवणूक झाल्यास तातडीने 1930 वर संपर्क साधा
इन्स्टंट लोनच्या नावाखाली बनावट ॲप्सद्वारे नागरिकांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक केली जात आहे. कोणतेही लोन ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी. अनोळखी एपीके फाईल किंवा लिंकवरून ॲप डाउनलोड करू नये. फसवणूक झाल्यास तातडीने 1930 हेल्पलाईन किंवा सायबर पोर्टलवर तक्रार करावी.
रविकिरण नाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर विभाग