

पिंपळे गुरव: साठ फुटी रोडवरील पदपथावर मोठ्या प्रमाणात कुशन कव्हर व इतर कचरा साचून राहिल्याने पादचार्ऱ्यांना येथून प्रवास करताना मुख्य रस्त्याचा वापर करावा लागत आहे. यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा कचरा उचलला जात नसल्याने आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या ठिकाणी स्मशानभूमी असल्यामुळे अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. तसेच परिसरातील पादचारी, वयोवृद्ध नागरिक, महिला व लहान मुलांसाठी हाच पदपथ सुरक्षित चालण्याचा एकमेव पर्याय आहे. मात्र, पदपथावर कुशन कव्हरचा प्रचंड ढिगारा साचल्यामुळे नागरिकांना नाईलाजाने थेट रस्त्यावरून चालावे लागत असून, अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
प्लास्टिक व कापडी कचरा उन्हात सडत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. परिणामी डास, माशा वाढण्याची शक्यता असून, संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. असे असताना आरोग्य विभागाने या ठिकाणी अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. स्मार्ट सिटीची फक्त जाहिरातबाजी सुरू असून, प्रत्यक्षात मूलभूत स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. पदपथ मोकळा न केल्यास आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
पदपथ कोणासाठी?
पदपथ हा पादचाऱ्यांसाठी असतो कचऱ्यासाठी नव्हे हे आरोग्य विभागाला कधी कळणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. पदपथावरील कचरा तात्काळ उचलून तो चालण्यासाठी मोकळा करण्यात यावा. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, आरोग्य विभागाचे डोळे कधी उघडणार, की एखादा अपघात घडल्यावरच प्रशासन जागे होणार, असा रोखठोक सवाल उपस्थित होत आहे.
जागामालकांना कचरा उचलून घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. दिलेल्या सूचनांचा दोन दिवसांत पाठपुरावा करण्यात येईल. या कालावधीत जागामालकांनी कचरा उचलून न घेतल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
शंकर घाटे, मुख्य आरोग्य निरीक्षक ड क्षेत्रीय कार्यालय, मनपा
गेल्या काही दिवसांपासून पदपथावर कुशन कव्हरचा कचरा पडून आहे. आरोग्य विभागाला वारंवार सांगूनही कुणी फिरकलेले नाही. स्मार्ट सिटी केवळ कागदावरच आहे.
स्थानिक नागरिक