

सांगवी: सांगलीला स्मार्ट सिटी म्हटले जाते, पण वस्तुस्थिती पाहता या शहराची वाटचाल आता झोपडपट्टीकडे चालली आहे, अशा शब्दांत संताप व्यक्त करत प्रभाग (जुनी सांगवी, नवी सांगवी, प्रभाग ३०, ३१, ३२) च्या प्रभागातील वाढती कचऱ्याची समस्या, मोकाट कुत्र्यांचा त्रास, अनधिकृत अतिक्रमणे आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर क्षेत्रीय कार्यालयातील बैठकीत जोरदार चर्चा झाली.
प्रभाग समितीच्या अध्यक्षा तृप्ती कांबळे यांच्या उपस्थितीत आणि क्षेत्रीय अधिकारी पूजा दूधनाळे यांच्या समवेत बैठक पार पडली. बैठकीत कचऱ्याचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. जोपर्यंत कचरा प्रक्रिया करून हक्काचा कचरा डेपो किंवा संकलन केंद्र मिळत नाही, तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही, असा सूर नगरसेवकांनी लावला. कचरा उचलल्यानंतर त्या जागेवर आरोग्य विभागाकडून कोणतेही निर्जंतुकीकरण किंवा फवारणी केली जात नाही.
यामुळे डासांची संख्या कमालीची वाढली असून, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांत वाढ होऊ शकते. नव्या सांगवीतील कचरा जुन्या सांगवीतील स्मशानभूमीच्या कचरा संकलनच्या ठिकाणी टाकला जातो. याच्या शेजारी स्थानिक नागरिकांना आणि दशक्रिया घाटावर येणाऱ्या शोककुल नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
कुत्र्यांची दहशत
जुन्या सांगवीत एका महिलेला कुत्र्याने इतक्या भयानक पद्धतीने चावा घेतला की, भीतीपोटी त्यांच्या हातातील लहान बाळ खाली पडले. मोठी दुर्घटना टळली. या अत्यंत गंभीर घटनेवर जाब विचारण्यासाठी प्रभाग बैठकीत उपस्थित राहणे बंधनकारक असलेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे स्वतः आले नाहीत, त्यांनी एका क्लार्कला पाठवले. तो क्लार्कही बैठक संपल्यानंतर आला आणि त्याला कुत्र्यांच्या नियोजनाबाबत कसलीही माहिती नव्हती. यामुळे नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या या अरेरावीवर तीव्र संताप व्यक्त केला.
अधिकाऱ्यांचा गलथान कारभारावर संताप
नव्या सांगवीत पदपथावर चक्क व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. परंतु, प्रशासन याकडे काणाडोळा करत आहे. कोण हफ्ते घेते आणि कोण खाते? असा थेट सवाल करत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर आता प्रत्येक चौकात एक निरीक्षक नेमून कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चौकाच्या नामांतरावरून वाद
नवी सांगवीतील ''फेमस चौक'' नामांतरावरून मोठा गदारोळ झाला. मात्र, हा विषय जिल्हा पातळीवरील समितीचा असून, तो प्रभाग अधिकारक्षेत्राबाहेर असल्याचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
६ जुलै रोजी झालेल्या पावसानंतरची कामे अद्याप रेंगाळलेली असल्याने नगरसेवकांनी प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नापसंती व्यक्त केली. नव्या जुन्या सांगवीत कचरा उचलणाऱ्या 9 गाड्या आहेत. सर्वांशी समन्वय साधून योग्य ती दखल घेऊन कारवाई करू
पूजा दुधनाळे, ह प्रभाग अधिकारी.