

देहूगाव: देहू-आळंदी रस्त्यावरील देहू काळोखे चौकाजवळ सुरू असलेले सुशोभित कमानीचे काम गेल्या चार-पाच वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. या कामामुळे रस्त्यावरील उपलब्ध जागा कमी झाली असून, सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे.
देहू येथून पिंपरी-चिंचवड, तळवडे, चाकण एमआयडीसी, तळवडे आयटी पार्कच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे देहू-आळंदी रस्ता हा वर्दळीचा मार्ग आहे. काळोखे चौकाजवळ पालिका हद्दीच्या सुरुवातीस सुशोभित कमान उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कमानीचे काम तातडीने पूर्ण करून कोंडीची समस्या दूर करावी, अशी मागणी महापौर रवी लांडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
कमानीच्या कामासाठी लागणारे बांधकाम साहित्य रस्त्याच्या परिसरात पडून असल्याने रस्त्याची उपलब्ध जागा कमी झाली आहे. परिणामी चालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, वाहतूक कोंडीबरोबरच अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. या मार्गावरून चाकण एमआयडीसी, तळवडे आयटी पार्क, देहू-देहूरोड परिसर तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची ये-जा होते. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा मोठा वेळ वाया जात आहे.
काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या उपाययोजना करा
कमानीचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याचे संबंधित विभाग व ठेकेदाराला आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच, काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूने टप्प्याटप्प्याने काम करावे, रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्य व यंत्रसामग्री तातडीने हटवून वाहतुकीसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी.
तसेच, गर्दीच्या वेळी अतिरिक्त वाहतूक नियंत्रण कर्मचारी व मार्गदर्शकांची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रसंगी भाजप कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संभाजी टिळेकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिरुद्ध काळोखे, किसान आघाडीचे अध्यक्ष रवींद्र काळोखे, उपाध्यक्ष सचिन मराठे, दत्ता हगवणे, ऋतिक मोरे, प्रद्युमन टिळेकर, सचिन काळोखे, रायबा मोरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.