AI Predictive Maintenance: मशीन बंद पडण्याआधीच ‘एआय’ देणार धोक्याची चाहूल; पिंपरी-चिंचवडच्या उद्योगविश्वात नवे तंत्रज्ञान

सेन्सरच्या मदतीने कंपन, तापमान, करंट आणि RPM मधील सूक्ष्म बदलांचे विश्लेषण; बिघाडापूर्वी देखभालीची शक्यता
AI Machine Monitoring
AI Machine MonitoringPudhari
Published on
Updated on

बजरंग मासाळ

पिंपरी: कारखान्यातील मशिन बंद पडण्याआधी त्यामध्ये होणारे सूक्ष्म बदलच ओळखता आले तर, याच कल्पनेवर आधारित तंत्रज्ञान पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक पट्ट्यात आकार घेत आहे. मशिनमधील कंपनाची पातळी बदलली, तापमान वाढल्यास आवाजात असामान्यपणा किंवा फिरण्याच्या वेगात फरक पडल्यास, सेन्सर तो बदल टिपून त्याच्या डेटाचे एआयच्या माध्यमातून विश्लेषण करता येईल. त्यातून संभाव्य बिघाडाची पूर्वचिन्हे दिसल्यास देखभाल यंत्रणेला आधीच सतर्क करण्याची पद्धत उद्योगक्षेत्रात पुढे येत आहे. मशिन बिघडल्यानंतर दुरुस्ती करण्याऐवजी बिघाडाची अचूक 'नाडी' तपासण्याचा प्रयत्न उद्योगनगरीमध्ये सुरू आहे.

AI Machine Monitoring
Pimpri Chinchwad Ganesh Visarjan DJ Noise: गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; पिंपरी-चिंचवडमध्ये २० गुन्हे दाखल

बिघाड नव्हे; बिघाडाची चाहूल महत्त्वाची

मोटार, पंप, ब्लोअर, कॉम्प्रेसर, गिअरबॉक्स, सीएनसी व व्हीएमसी मशिनिंग फॅन यांसारख्या यंत्रसामग्रीत मोठा बिघाड अचानक झाल्यास उत्पादन थांबण्याबरोबरच दुरुस्तीचा खर्च आणि वेळ दोन्ही वाढतात. मात्र अनेक बिघाडांची सुरुवात अत्यंत लहान बदलांपासून होते. बेअरिंगमध्ये झीज सुरू होणे, शाफ्टमध्ये असंतुलन निर्माण होणे, मिसअलाइनमेंट, ल्युब्रिकेशनमधील त्रुटी किंवा मोटरच्या कार्यपद्धतीत बदल झाल्यास मशीनच्या कंपन, तापमान अथवा विद्युत वापराच्या पॅटर्नमध्ये फरक पडू शकतो. हे सूक्ष्म बदल माणसाच्या नजरेला लगेच जाणवतीलच असे नाहीत; मात्र सेन्सर आणि डेटा विश्लेषणाच्या माध्यमातून ते टिपण्याची क्षमता 'एआय'च्या माध्यमातून वाढत आहे.

AI Machine Monitoring
Pimpri Chinchwad Water Park: पिंपरी-चिंचवड महापालिकेला ठेकेदाराचा ‘धक्का’; वॉटर पार्कचे ८३.३७ लाख भाडे थकीत

कारखान्याच्या बाहेरही 'AI ची गस्त'

औद्योगिक क्षेत्रातील या तंत्रज्ञानाचा विस्तार कारखान्याच्या भिंतीबाहेरही होत आहे. तेल, पाणी, गॅस किंवा अन्य द्रव वाहून नेणाऱ्या लांब पल्ल्याच्या पाइपलाइनची पाहणी करण्यासाठी ड्रोन, थर्मल/व्हिज्युअल सेन्सर आणि AI आधारित इमेज विश्लेषणाचा वापर करण्याच्या प्रणाली विकसित होत आहेत. शेकडो किलोमीटरच्या पाइपलाइनची मानवी पथकाद्वारे सातत्याने पाहणी करणे वेळखाऊ असते. ड्रोनच्या माध्यमातून पाइपलाइनच्या मार्गाचे दृश्य व इतर सेन्सर डेटा संकलित करून AI संशयास्पद भाग ओळखण्यास मदत करू शकते. गळती, पृष्ठभागावरील असामान्य बदल, अतिक्रमण किंवा संभाव्य धोक्याच्या खुणा आढळल्यास संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष तपासणी करता येते, अशी माहिती संबंधित अभियंत्यांनी दिली.

सेन्सर घेणार मशिनचा 'हेल्थ रिपोर्ट'

या प्रणालीमध्ये मशिनवर विविध प्रकारचे सेन्सर बसवून त्याची स्थिती सातत्याने नोंदविली जाते. कंपन, तापमान, RPM, मोटर करंट, अल्ट्रासाऊंड यांसारख्या पॅरामीटरचा डेटा एकत्रित केला जातो. हा डेटा केवळ साठवला जात नाही, तर त्यातील बदलांचे विश्लेषणही केले जाते. मशीनच्या पूर्वीच्या कार्यपद्धतीशी सध्याच्या स्थितीची तुलना करून काही असामान्य बदल आढळल्यास बिघाडाची पूर्वसूचना मिळू शकते. यामुळे देखभाल विभागाला 'मशिन बंद पडले' अशी माहिती मिळण्याऐवजी 'मशिनच्या कार्यक्षमतेत बदल सुरू झाला आहे' अशी पूर्वसूचना मिळू लागते.

AI Machine Monitoring
Pimpri Chinchwad Mahaprasad: पिंपरी-चिंचवडमध्ये २ हजार केटरर्स; महाप्रसादासाठी नोंदणी अवघी २१५ जणांची!

'कॅमेऱ्या'तूनही शोधला जाणार दोष

'एआय'चा वापर केवळ मशिनच्या आतील स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी होत नाही. उत्पादन प्रक्रियेत मशिन व्हिजन आणि 2D-3D इमेजिंगच्या माध्यमातून तयार होणाऱ्या भागांची तपासणीही केली जात आहे. उत्पादनातील दोष, मोजमापातील फरक, assemblyमधील त्रुटी किंवा नेहमीच्या नमुन्यापेक्षा वेगळा भाग AI आधारित प्रणाली ओळखू शकते.

मेंटेनन्सची वेळ आता मशिन ठरवणार?

आजपर्यंत अनेक उद्योगांमध्ये मशिनची देखभाल ठरावीक कालावधीनंतर केली जाते. मात्र प्रत्येक मशिनची झीज समान नसते. त्यामुळे 'वेळ झाली म्हणून सर्व्हिस'ऐवजी 'मशिनला गरज आहे म्हणून सर्व्हिस' हा विचार पुढे येत आहे.

मात्र AI म्हणजे अंतिम निर्णय नाही!

या तंत्रज्ञानाबाबत एक महत्त्वाची मर्यादा आहे. AIने अलर्ट दिला म्हणजे मशीन नक्कीच बिघडणार, असा त्याचा अर्थ नाही. AI संभाव्य असामान्य पॅटर्न किंवा धोका दाखवते. त्यानंतर प्रत्यक्ष मशीनची तांत्रिक तपासणी आणि अभियंत्याचा निर्णय आवश्यकच राहतो. पिंपरी-चिंचवडच्या उद्योगविश्वात सुरू असलेला हा बदल 'मशीनला माणसाची गरज नाही' असा नसून, माणसाच्या निर्णयाला अधिक अचूक डेटा देणाऱ्या तंत्रज्ञानाचा विस्तार म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल.

AI Machine Monitoring
Chakan Gutkha Seizure: चाकणमध्ये ९३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; कंटेनरचालकाला अटक

एआयची नजर कुठे ?

  • कंपन-बेअरिंग, शाफ्ट आणि मोटरमधील बदल

  • करंट-मोटरच्या विद्युत वापरातील फरक

  • अल्ट्रासाऊंड-असामान्य ध्वनीची चाहूल

  • ऐतिहासिक डेटा-मशिनच्या जुन्या व सध्याच्या कामगिरीची तुलना

यंत्रसामग्रीतील अनपेक्षित बिघाडामुळे उद्योगांचे उत्पादन, वेळ आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. हे नुकसान बिघाड झाल्यानंतर भरून काढण्यापेक्षा तो होण्यापूर्वीच त्याची चाहूल घेऊन टाळणे अधिक महत्त्वाचे आहे. सेन्सर, AI आणि इंटेलिजंट सॉफ्टवेअरच्या साहाय्याने मशीनच्या कार्यक्षमतेतील सूक्ष्म बदल वेळीच ओळखता येतात.

मयूर धामणे, संस्थापक व सीईओ, एआय व इंटेलिजंट सॉफ्टवेअर तंत्रज्ञान

मोरवाडी आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मशिनवर प्रात्यक्षिक देण्यापूर्वी आधुनिक मॉडेल सिम्युलेटरवर प्रशिक्षण दिले जाते. सिम्युलेटरवर आवश्यक कौशल्य आणि मशिन ऑपरेशनचे पुरेसे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरच त्यांना प्रत्यक्ष सीएनसी व व्हीएमसी मशीन हाताळण्याची संधी दिली जाते. त्यामुळे प्रशिक्षणादरम्यान अपघाताचा धोका कमी होतो.

शशिकांत पाटील, प्राचार्य तथा विभागप्रमुख औद्योगिक प्रशिक्षण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news