

पिंपरी: जोरदार पावसामुळे दुरवस्था झालेल्या ड्रेनेज चेंबरवर झाकणे बसविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे; मात्र धोका टाळण्यासाठी बसविलेल्या झाकणाभोवतीच जुन्या तुटलेल्या झाकणांचाच अडथळा उभा करण्यात आल्याचे चित्र शहरात काही ठिकाणी दिसून येत आहे. सिमेंटचे काम खराब होऊ नये म्हणून तुटलेली झाकणेच आजूबाजूला ठेवण्यात आली आहेत. या तुटलेल्या झाकणांमुळे दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका वाढला आहे.
दुरुस्तीचा ‘पॅचवर्क’
पावसाळ्यात शहरातील अनेक रस्त्यांवरील ड्रेनेज चेंबरची झाकणे खराब झाली अथवा पाण्याच्या प्रवाहामुळे बांधकाम खचले. काही ठिकाणी झाकणे फुटली, तर काही ठिकाणी ती चेंबरमधून बाहेर पडून रस्त्यावर पडली. परिणामी, वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी ही ठिकाणे धोकादायक बनत आहेत.
महापालिकेने आता अशा ठिकाणी नवीन झाकणे बसविण्यास सुरुवात तर केली आहे; मात्र दुरुस्तीच्या पद्धतीमुळे नवा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन झाकणे बसविल्याचे बांधकाम खराब होऊ नये म्हणून त्याभोवतीच जुनी झाकणे टाकण्यात आली आहेत. बांधकाम पक्के होईपर्यंत वाहने त्या भागावरून जाऊ नयेत, यासाठी साधारणपणे बॅरिकेडिंग करणे अपेक्षित असते. मात्र, काही ठिकाणी तुटलेली जुनी ड्रेनेज झाकणेच नवीन बांधकामाभोवती ठेवण्यात आल्याचे दिसत आहे. परिणामी, सुरक्षेसाठी केलेली ही तात्पुरती व्यवस्था स्वतःच अडथळा बनत आहेत. दिवसा रस्त्यावर पडलेले झाकण सहज दिसू शकते. मात्र, रात्रीच्या वेळी दिसून न आल्याने दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोक संभवू शकतो.
बॅरीकेडिंगच्या नावाखाली भंगाराचा वापर?
दुरुस्तीच्या ठिकाणी नागरिकांना प्रवेश होऊ नये, यासाठी योग्य बॅरिकेडिंग करणे हा सुरक्षित पर्याय आहे. मात्र, तुटलेली ड्रेनेज झाकणेच बॅरिकेडसारखी वापरली जात असतील तर त्यांच्या तीक्ष्ण, असमान किंवा तुटलेल्या भागांमुळे उलट धोका निर्माण होऊ शकतो. सुरक्षा व्यवस्था ही केवळ अडथळा निर्माण करण्यापुरती नसून ती नागरिकांना स्पष्टपणे दिसणारी आणि अपघात रोखणारी असणे आवश्यक आहे.
ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करताना नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत आहे. दुरुस्तीच्या ठिकाणी तुटलेली झाकणे किंवा बांधकाम साहित्यामुळे नागरिकांना अडथळा अथवा धोका निर्माण होत असल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना ते तातडीने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आवश्यक ठिकाणी बॅरीकेडिंग व रिफ्लेक्टरची व्यवस्था करण्याबाबत कार्यवाही केली जाईल.
अजय सुर्यवंशी, सह शहर अभियंता, स्थापत्य विभाग, शहरी दळण वळण
सायंकाळनंतर रस्त्यावरची तुटलेली झाकणे दिसत नाहीत. त्यामुळे प्रत्येक दुरुस्तीच्या ठिकाणी रिफ्लेक्टर, बॅरिकेड आणि सूचना फलक असणे गरजेचे आहे. नागरिकांचा अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा दुरुस्ती सुरू असतानाच प्रतिबंधात्मक व्यवस्था करावी.
महेश बाभुळकर, वाहनचालक