

दापोडी: येथील पवना घाट व कासारवाडी येथे विसर्जन हौदाची दुर्दशा झाली होती. गणेशोत्सव प्रारंभ होत असताना काल दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन करताना दापोडी-पवना घाट व कासारवाडी येथील विसर्जन हौदातून गळती असल्याचे दिसून आले होते. यामुळे गणेशमूर्ती विसर्जनाची वाट बिकट बनली होती. अखेर या ठिकाणी प्लास्टिकची टाकी ठेवण्यात आली आहे.
‘दापोडीत बाप्पाच्या विसर्जनाची वाट बिकट’ या मथळ्याखाली दैनिक पुढारीने बुधवारी (दि. 16) छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर लगेचच बुधवारी सायंकाळी त्या ठिकाणी प्लास्टिकची टाकी ठेवण्यात आली. दोन्ही टाक्यांमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
महापालिकेच्या वतीने वर्षभरात असलेले विविध उत्सव आणि पर्यावरणपूरक सुविधासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, दापोडीतील बॉम्बे कॉलनी येथील घाटावर बनविलेल्या हौदाला आतून व बाहेरच्या बाजूने तडा गेला होता.
या हौदातील पाणी दहा मिनिटांत संपून जात होते. त्यामुळे स्थानिक भक्तांना गणेशमूर्ती विसर्जन कसे करायचे हा प्रश्न पडला होता. अखेर घाटावर प्लास्टिकची टाकी बसविल्यामुळे गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याबाबत नगरसेवक राजू बनसोडे, आरोग्य निरीक्षक सचिन जाधव, आरोग्य मुकादम सतीश घोलप, आनंद कांबळे, मोसिन शेख यांनी विशेष प्रयत्न केले.