

पिंपरी: हवामान बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. शहरात सप्टेंबर महिन्यामध्ये पंधरा दिवसांत आतापर्यंत मलेरियाचे 2 तर डेंग्यूचे 38 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये मलेरियाच्या 21497 संशयित रुग्णांपैकी 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर डेंग्यूच्या 905 संशयित रुग्णांपैकी 38 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
पावसाने उघडीप दिल्यानंतर सतत बदलत्या हवामानामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळा डास व मच्छराची सर्वाधिक उत्पत्ती असणारा ऋतू आहे. सध्या पाऊस थांबल्यामुळे नाले भरून वाहण्याचे थांबले आहेत.
त्यामुळे कचरा आणि इतर गोष्टी तशाच नाल्यांमध्ये साचून राहिल्या. जो काही थोडा फार पाऊस झाला, त्यामुळे ही वाहण्याची प्रक्रिया थांबली. त्याचा परिणाम गेल्या काही दिवसांपासून जाणवत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिं. चिं महापालिकेतर्फे 'ब्रेक द चेन' ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेचा उद्देश केवळ उपचारांपुरता मर्यादित नसून प्रतिबंधात्मक उपाय, जनजागृती, स्वच्छता आणि नागरिकांच्या सहभागातून शहरात डास निर्मूलन करणे हा आहे. त्या पार्श्वभूमीवर डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे.