

देहूगाव: भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्पाचे काम करताना इंद्रायणी नदीपात्रात टाकण्यात आलेला राडारोडा अद्याप हटविण्यात आलेला नाही. संबधित ठेकेदाराने १५ दिवसांत राडारोडा काढणार असे सांगितले होते. ऑक्टोबर अखेर, इंद्रायणी नदीतील पाणी आटल्याने, राडारोडा तसाच जागेवर असल्याचे उघड झाले होते. तत्पूर्वी देहू नगरपंचायतीने संबंधित जावळे कन्स्ट्रक्शनला राडारोडा हटवून नदीपात्र पूर्ववत करण्याची नोटीस बजावली होती. परंतु अद्याप संबंधित ठेकेदाराने राडारोडा हटविला नाही. यामुळे ठेकेदारावर प्रशासन एवढे मेहेरबान का, असा प्रश्न नागरिक करत आहेत.
या संदर्भात दैनिक पुढारीमध्ये ३० ऑक्टोबर रोजी राडारोडा इंद्रायणीच्या पत्रात तसाच पडून असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते; परंतु दुसऱ्या दिवशी पाट बंधारे विभागाने संबंधित जावळे कट्रक्शनवर कृपा केली आणि धरणातून पाणी सोडले. परिणामी इंद्रायणी नदीत पाणी आल्याने, उघडा पडलेला राडारोडा पाण्याखाली झाकला गेला. आता त्यामुळे नगर पंचायतीने दिलेली नोटीस आता फक्त कागदावरच राहिली आहे. नगर पंचायतीने त्या ठेकेदारावर कारवाई करणे आवश्यक असताना, नगर पंचायतीचे अधिकारी जावळे कन्ट्रक्शनवर कारवाई न करता मेहेरबानी का करीत आहेत, असा प्रश्न देहूचे ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत. आता देहू नगर पंचायत, काय दंडात्मक कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देहू नगरपंचायत हद्दीतील साई चौक ते वडाचा माळदरम्यान असलेल्या पुलाजवळ भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्पांतर्ग पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नदीपात्रात टाकलेला राडारोडा आणि बांधकामातील अवशेष पूर्णपणे हटविणे आवश्यक होते. मात्र, ते हटविण्यात आलेले नाहीत. यामुळे पावसाचा व नदीला पाणी सोडल्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांना व शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे.
नदीच्या प्रवाहात बदल; शेतकऱ्यांचे नुकसान
नदीपात्रात टाकण्यात आलेल्या राडारोड्यामुळे इंद्रायणी नदीच्या नैसर्गिक प्रवाहात बदल होत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. परिणामी, येलवाडी परिसरातील शेतजमिनीत पाणी शिरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. याला जबाबदार कोण? देहूनगर पंचायत की, जावळे कन्ट्रक्शन राहणार, असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. नदीपात्रातील राडारोडा आणि बांधकाम साहित्य अद्याप हटविण्यात आले नसल्याने नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण होण्याची शक्यता नगरपंचायतीने नोटिशीत नमूद केली होती. नदीपात्रातील सर्व अवशेष हटवून ते पूर्ववत करणे ही संबंधित ठेकेदाराची जबाबदारी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते.
नोटीसनंतरही राडारोडा तसाच
नगर पंचायतीने दोन दिवसांची मुदत देऊनही नदीपात्रातील राडारोडा अद्याप कायम असल्याचे प्रत्यक्ष परिस्थितीवरून दिसत आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या नोटीसनंतरही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. जावळे कन्ट्रक्शनकडून, देहू नगर पंचायतीच्या नोटीसला वाटाण्याच्या अक्षदा लावला असल्याचे स्पष्ट होत आहे.