

पिंपळे गुरव: पिंपरी-चिंचवडमधील अत्यंत वर्दळीच्या नाशिक फाटा मुख्य चौकातील पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबरी भाग उखडल्याने मोठे खड्डे निर्माण झाले असून, हे खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सिमेंटचे गट्टू टाकण्यात आले आहेत. मात्र, या तात्पुरत्या उपाययोजनेमुळे वाहनचालकांची गैरसोय होत असून, वाहतुकीचा वेगही मंदावला आहे.
नाशिक फाटा चौक हा भोसरी-पुणे मार्गावरील महत्त्वाचा चौक असून, या ठिकाणी दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. विशेषतः पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना या उखडलेल्या रस्त्यामुळे सावकाश मार्गक्रमण करावे लागत आहे. परिणामी, चौकात वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
या चौकात वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा कार्यरत असतानाच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. दुचाकीस्वारांना या ठिकाणाहून जाताना विशेष काळजी घ्यावी लागत असून, खड्ड्यांमधील दगडी गट्टू आणि उखडलेला रस्ता अपघाताचा धोका निर्माण करू शकतात. कामाच्या वेळेत या मार्गावरून जाणाऱ्या चाकरमान्यांना आणि रुग्णवाहिकांनाही या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे.
नागरिकांची होणारी रोजची घुसमट आणि अपघाताची टांगती तलवार लक्षात घेता, संबंधित महापालिका प्रशासनाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून दर्जेदार डांबरीकरण व कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
तात्पुरत्या दुरुस्तीऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करा!
महत्त्वाच्या चौकातील रस्त्याची अशी अवस्था असताना केवळ दगडी गट्टू टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न कितपत प्रभावी ठरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेचा विभाग याकडे डोळेझाक करत असून, केवळ मलमपट्टी करून जबाबदारी झटकली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पावसाळा असो वा नसो, या रस्त्याची अवस्था बिकटच राहत असल्याने प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पाणीपुरवठा विभागाकडून येथे खोदाई करण्यात आली आहे. पाणीपुरवठ्याची पाइपलाइन दोन वेळा लिकेज झाली होती. पहिल्यांदा दुरुस्ती करण्यात आली; मात्र पुन्हा लिकेज झाल्याने काम करावे लागले. सध्या दिवाळीमुळे डांबरीकरणाचे प्लांट बंद आहेत. दिवाळी संपल्यानंतर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल. खोदाईची दुरुस्ती पाणीपुरवठा विभागाऐवजी स्थापत्य विभागामार्फत केली जाणार आहे.
संतोष कुदळे, उपअभियंता, शहर दळणवळण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
नाशिक फाटा हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा चौक आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. अशा महत्त्वाच्या रस्त्यावर खड्डे पडणे आणि ते बुजवण्यासाठी केवळ दगडी गट्टू टाकणे ही तात्पुरती मलमपट्टी आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. आधीच सिग्नलवर वाहनांची गर्दी असते, त्यात रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. महापालिका प्रशासनाने केवळ तात्पुरती डागडुजी न करता या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करून वाहनचालकांना दिलासा द्यावा.
सुजित कडदेकर, सामाजिक कार्यकर्ता, कासारवाडी.