

मोशी : चोविसावाडी रहिवासी परिसरात रात्रंदिवस बेकायदेशीर क्रशर प्लांट सुरू आहे. या क्रशरमुळे हवा आणि ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे अबालवृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा क्रशरचा प्लांट रहिवासी झोनमध्ये असून, आजूबाजूच्या सोसायटी-धारकांनी हा बेकायदेशीर प्लांट बंद करण्याची मागणी सातत्याने तहसीलदारांकडे केली आहे. अद्याप यावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सोसायटीधारकांनी संताप व्यक्त केला आहे.(Latest Pimpri chinchwad News)
परिसरातील प्रणाम टॉवर, कोरल पार्क, सफायर टॉवर, रिद्धी-सिद्धी, अकार इंडिगोसह अन्य सोसायटीतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच क्रशर प्लांटच्या बाजूला रेडक्लिप नावाची शाळा आहे. त्यांनाही धुळीचा त्रास होतो आहे. शाळेवर धुळीचे थर साचले आहेत. गेल्या सात-आठ वर्षांत चोविसावाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प झाले. यामुळे हजारो नागरिक या ठिकाणी वास्तव्यास आल्याने नागरिकांची प्रचंड वर्दळ वाढली आहे. या क्रशरमुळे हवा आणि ध्वनिप्रदूषण वाढू लागल्याने त्यांचा त्रास सोसायटीतील नागरिकांना होत आहे. नागरिकांच्या घरात, वाहनांसह हवेत धूळ पसरत आहे. क्रशरमुळे हवेत धूळ मिसळून हवेची गुणवत्ता ढासळून 300 पेक्षा अधिक हवेचा निर्देशांक गेला आहे. हे प्रमाण धोकादायक पातळीपेक्षा जास्त मानले जाते. तेथील नागरिकांसह अबालवृद्ध, महिला, लहान मुलांचे आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.
चोविसावाडी व मोशी हद्दीतील क्रशर प्लांट बंद करा, अशी मागणी हजारो नागरिकांनी केली आहे. याबाबत पुणे जिल्हाधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड अप्पर तहसीलदार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे.
महापालिका हद्दीत असलेल्या चोविसावाडी परिसरात आवश्यक परवानगी न घेता क्रशर प्लांट सुरू आहेत. हे क्रशर प्लांट सोसायटीपासून अगदी 500 ते 700 फूट अंतरावर आहेत. त्यामुळे ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा त्रास सोसायटीधारकांना होतो आहे. क्रशरचालकांकडून पर्यावरण नियमांचे पालन न करता सर्रासपणे उल्लंघन सुरू आहे. धुळीमुळे श्वसनाचे विकार, दम्याचे आजाराचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे.
पोपट तापकीर, रिद्धी-सिद्धी सोसायटी रहिवासी