

मोशी: साने चौकापासून ते चिखली-आकुर्डी रस्ता, म्हेत्रे गार्डन रस्ता, नेवाळे वस्ती या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. चिखली-आकुर्डी रस्त्यावर महापालिका प्रशासनाने कारवाई केली, मग रस्ता रुंदीकरण कधी करणार? आणि वाहतूककोंडी कधी सुटणार?, असे सवाल नागरिकांकडून केले जात आहेत. तसेच, रस्ता रुंदीकरण होइपर्यंत वाहतूककोंडी सुरुळीत करण्यासाठी वाहतूक पोलिस सायंकाळच्या वेळी नेमण्यात यावे, अशी मागणीही करण्यात येत आहे.
अनेकांनी रस्त्यावरच थाटली दुकाने
चिखली-आकुर्डी हा रस्ता चिखली गावठाण परिसरापासून गणेशनगर, नेवाळेवस्ती, साने चौक, कृष्णानगर या रहिवाशी क्षेत्राचा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यालगत हजारो नागरिकांचे वास्तव्य आहे. हा परिसर शहरातील दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून ओळखला जातो. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी काही महिन्यांपूर्वी महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमणे काढण्यात आली हेाती. मात्र, अतिक्रमणे काढूनदेखील रस्ता रुंदीकरण रखडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
या रस्त्यावर अनधिकृतरित्या सायंकाळच्या वेळी अनेक विक्रेते आपले व्यवसाय थाटतात. यामुळे सध्या असलेला रस्ता अरुंद होतो व वाहतूककोंडी होते. अनधिकृतरित्या रस्त्यावर दुकाने लावून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. रस्ता रुंदीकरण रखडलेले, अनधिकृत व्यावसायिकांकडून पदपथांवर केलेले अतिक्रमण, बेशिस्त वाहन पार्किंग, रस्त्यावरील खड्डे, असमतोल चेंबर यामुळे वाहतूक मंदावली जाते. मुख्य दुकानासमोरील पार्किंगच्या जागेत छोटे व्यावसायिक दुकाने थाटतात, वाहतूक पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे वाहतूककोंडी नित्याचीच डोकेदुखी ठरत आहे.
महापालिका प्रशासन व वाहतूक विभागाच्या समन्वयाने ही समस्या सोडवणे गरजेचे आहे. या परिसरातील लोकवस्ती व बाजारपेठ लक्षात घेता योग्य पार्किंग सुविधा व पथारी विक्रेत्यांसाठी हॉकर्स झोनची निर्मिती करणे गरजेचे आहे.
राहुल भोसले, युवा नेते
चिखली-आकुर्डी रस्त्याचे रुंदीकरण रखडले नसून, त्या संदर्भातील अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. वरिष्ठ पातळीवरून तांत्रिक बाबींची पडताळणी होऊन मंजुरी मिळताच काम सुरू केले जाईल. त्यासाठी काही कालावधी लागेल.
शिवाजी चौरे, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग
चिखली-आकुर्डी रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर 24 मीटर रस्त्याचे काम सुरू करणे आवश्यक होते. त्यासाठी कोणाचा विरोध नाही. वाहतूककोंडी सुरुळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे गरजेचे आहे.
यश साने, युवा नेते
या रस्त्यावरील वाहतूककोंडी नियंत्रित करण्यासाठी वाहतूक विभागाकडून पार्किंगसाठी मार्किंग करण्यात आलेली आहे, नागरिकांनी शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे. वाहतूककोंडी सुरुळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस लक्ष देतील.
रामचंद्र घाडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तळवडे वाहतूक विभाग