

चऱ्होली: चऱ्होलीच्या कोल्हापूर पद्धतीच्या केटी बंधाऱ्यापासून दोन्ही चऱ्होलींना जोडणाऱ्या पुलापर्यंतच्या संपूर्ण नदीपात्रावर फार मोठ्या प्रमाणावर फेस जमा झाला आहे. यामुळे ही इंद्रायणी आहे की बर्फ पडला आहे, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. दूषित व रसायनयुक्त पाण्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे.
लोणावळ्यात उगम पाऊन तुळापूरमध्ये भीमानदीला मिळेपर्यंत विविध गावातून, शहरातून, शेत शिवारातून, तीर्थक्षेत्रांतून आणि औद्योगिक पट्ट्यांमधून वाहणारी इंद्रायणी नदी भोवतालच्या सर्व प्रदूषणामुळे दूषित होत आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर औद्योगिक उपनगरे उभी राहिल्यामुळे आणि मोठमोठ्या गृहप्रकल्पांना सामावून घेतलेली शहरे आणि त्यांच्या अवाढव्य लोकसंख्या या सगळ्या परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर सांडपाणी आणि ड्रेनेजचे मैलामिश्रित पाणी इंद्रायणी नदीपात्रात मिसळत आहे.
देहू-आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रांच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धार्मिक विधी चालतात. त्यामुळे साहजिकच गुलाल, बुक्का, कुंकू, हळद आणि इतर निर्माल्य नदीपात्रात फेकले जाते. त्यातूनही पाणी दूषित होत आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रातील रसायनमिश्रित पाण्यामुळे विविध रसायने पाण्यामध्ये मिसळत आहेत आणि त्यातून इंद्रायणीचा प्रवाह पूर्ण दूषित होत आहे. काही ठिकाणी पाणी पूर्ण काळे पडले असून, पाणवनस्पती मोठ्या प्रमाणावर पृष्ठभागावर तरंगताना दिसत आहेत. काही ठिकाणी तर पूर्ण किनारे शेवाळलेले आहेत. या सर्व परिस्थितीचा परिणाम म्हणून चऱ्होलीत येईपर्यंत इंद्रायणीचे पाणी पूर्ण दूषित होत आहे.
जलचरांचे जीवन धोक्यात
इंद्रायणी नदीने प्रदूषणाची सीमा पार केली आहे. आळंदी, देहू येथील घाटांवर रात्रीच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी गेलो तर पाण्याच्या दुर्गंधीने काठावर बसू वाटत नाही. नदीच्या काठावर आलो आहे की गटारगंगेच्या काठावर, असा प्रश्न भाविकांमध्ये निर्माण होत आहे. दूषित पाण्यामुळे नदीपात्रातील जलचरांचे जीवन धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असून, मोठ्या प्रमाणावर मासे, खेकडे, बगळे मरून पडत आहेत.
पाण्याला उग््रा दर्प
चऱ्होली परिसरात पुलाच्या आजूबाजूला आणि कोल्हापूर पद्धतीचे केटी बंधाऱ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाण्याला उग््रा वास येत आहे. या ठिकाणी उभे राहणेदेखील मुश्कील होत आहे. नदीच्या कडेला मोठ्या प्रमाणावर मृत पक्षी आणि मासे यांचा खच पडलेला आहे. खरंतर जलचर प्राण्यांचा जगण्याचा नैसर्गिक हक्कच मानवी प्रदूषणामुळे हिरावला जात आहे. आपण किती दिवस ही परिस्थिती फक्त मूग गिळून गप्प बसून पाहत राहणार हाच प्रश्न आहे.
इंद्रायणी नदीचे प्रदूषण हा खूप दिवसांपासूनचा प्रश्न आहे. प्रशासनाने गांभीर्याने या विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण चऱ्होली परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर या प्रदूषित पाण्याचा परिणाम होत आहे.
सचिन तापकीर, नगरसेवक