Women Transport Driver Training Maharashtra: प्रवासी वाहतूक व्यवसायात महिलांची एन्ट्री; 60 जणींना मोफत टुरिस्ट लायसन्स प्रशिक्षण
पिंपरी: प्रवासी वाहतूक व्यवसायामध्ये महिला उद्योजिका दिसणार असून, चालकापासून ते मालकापर्यंत या व्यवसायास नवे रुपडे देण्याचा मानस महिलांनी व्यक्त केला आहे. त्याच धर्तीवर राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या वाहनचालन व प्रशिक्षण संस्था (आयडीटीआर) याने पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 60 महिलांना तंत्रशुद्ध वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, या मोफत प्रशिक्षणानंतर महिलांना वाहन परवाना (टुरिस्ट) देण्यात येणार आहे. पर्यटनअंतर्गत विविध योजना आणि स्वतंत्र व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हे प्रशिक्षण मैलाचा दगड ठरणार आहे.
पर्यटन क्षेत्रात महिलांना संधी
वेगवेगळ्या क्षेत्रात, नोकरीत आणि व्यवसायात महिला दिसून येतात. त्यात अलीकडच्या काळात पर्यटन क्षेत्रातदेखील महिलांनी उडी घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाहतूक क्षेत्रात करिअरसाठी महिला आता वळू लागल्या आहेत. त्यानुसार, या व्यवसायाठी राज्य शासनाकडूनदेखील वेगवेगळ्या योजना, कर्ज, विविध सवलती मिळू लागल्या आहेत. त्यानुसार आता अनेक महिलांनी वाहतूक व्यवसायाला करिअरसाठी पसंती दिली आहे. आयडीटीआर कासारवाडी ही संस्था अशा महिलांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देत आहे. चार महिन्यांचे हे प्रशिक्षण मोफत असून, त्यात तांत्रिक, अभ्यासात्मक आणि प्रत्यक्ष वाहनांवरील माहिती पुरविण्यात येत आहे. ऐवढेच नव्हे, तर नोकरीविषयक प्रशिक्षण, स्वतः व्यवसायासाठी मार्गदर्शन आणि आर्थिक व डिजिटल साक्षरता करण्यात येणार असून, यामुळे महिलांचे आर्थिक सबळीकरणासाठी एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे.
ड्रायव्हिंग नव्हे, तर थेअरी अन् प्रॅक्टिकल
संस्थेच्या वतीने महिलांना केवळ वाहन चालविण्यासाठी शिकविण्यात येणार नसून, वाहनांची जुजबी माहिती, सिग्नल आणि वाहतुकीचे नियम, विविध राज्यांतील रोड ट्रान्सपोर्टचे नियम शिकविण्यात येणार आहेत. चार महिन्यांत वाहनांची इत्भूंत माहिती देण्यात येणार असून, रस्त्यावरील सुरक्षित वाहनचालक निर्माण होऊ शकतील.
पर्यटन विभागाला चालना
राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने पर्यटन वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम, योजना राबविल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून महिलांना व्यवसाय प्रोत्साहनासाठी बिनव्याजी कर्ज योजना जाहीर केली आहे. या माध्यमातून 15 लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते. 41 वेगवेगळ्या प्रकारांचे व्यवसाय असून, त्यात वाहतूक व्यवसाय हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे महिलांना एक करिअर म्हणून मार्ग मोकळा झाला आहे.
वाहन चालविण्याबरोबरच त्या वाहनांची माहिती, वाहतुकीचे नियम आणि जबाबादाऱ्या याची माहिती असणे आवश्यक आहे. रस्त्यावर उत्तम चालक निर्माण करणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षणाद्वारे महिलांना चांगले करिअर घडवता येईल.
संजय ससाणे, प्राचार्य, आयडीटीआर

