

वडगाव मावळ: आधीच बँकेकडे गहाण ठेवलेल्या सदनिका पूर्ण मोबदला स्वीकारून एका बरोबर करार केला तर त्याच सदनिका परस्पर इतर तिघांना विकल्याचा धक्कादायक प्रकार वडगाव मावळ येथे घडला आहे. अशा पद्धतीने पैशांचा अपहार करून ग््रााहकांची फसवणूक केल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी संबंधित बिल्डर्सवर गुन्हा दाखल केला असून, दोघेही फरार आहेत.
वडगाव मावळ येथील ‘साई अनिरुद्ध धाम’ या निवासी व व्यापारी प्रकल्पामध्ये गहाण ठेवलेल्या सदनिकांची विक्री करून ग््रााहकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एस. एम. डब्ल्यू. बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे विकसक सतीश महेश वाघेला व महेश मोहन वाघेला (रा. निगडी प्राधिकरण, पुणे) यांच्याविरुद्ध वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव नगरपंचायत हद्दीतील सर्व्हे नं. 63/7 मधील प्लॉट नं. 19 व 20 येथे ‘साई अनिरुद्ध धाम’ हा प्रकल्प जाहीर करून परिसरात सदनिकांची जाहिरात करण्यात आली होती. प्रकल्पातील सदनिका क्र. 101, 102 व 105 ह्या सदनिकांचा चंद्रकांत शामराव ठोंबरे यांच्याकडून पूर्ण मोबदला स्वीकारून करार करण्यात आला. त्यानंतर संबंधित सदनिका अनुक्रमे दत्तात्रेय संजय केसकर, अशोक संजय केसकर व रुपाली सुहास ढोरे यांना नोंदणीकृत करारनाम्याद्वारे विक्री करण्यात आल्या.
दरम्यान, प्रकल्पातील सदनिका क्र. 101, 102, 104, 105, 205, 301, 304, 404, 405 तसेच व्यापारी गाळे क्र. 01 ते 04 या सर्व मिळकती नांदेड मर्चंट बँक, कर्वे रोड, पुणे येथे सुमारे एक कोटी रुपयांच्या कर्जासाठी गहाण ठेवण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. ही बाब जाणीवपूर्वक लपवून ठेवून विकसक वाघेला यांनी ग््रााहकांकडून पूर्ण रक्कम स्वीकारली व त्यांना सदनिकांचा ताबा दिला. त्यामुळे सदनिकाधारकांवर जप्तीची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
याशिवाय, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला व भोगवटा प्रमाणपत्र न घेता तसेच ग््रााहकांकडून प्राप्त झालेल्या रकमेचा स्वतंत्र बँक खात्यात हिशोब न ठेवता अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे ग््रााहकांचा विश्वासघात व आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 316 (5), 318 (2), 318 (4), 3 (5) तसेच महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबाबत अधिनियम 1963 मधील कलम 3, 4, 5, 6, 11, 13, 14 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे वडगाव शहर व परिसरातील विशेषतः सदनिका धारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून, कोणाच्या विश्वासावर सदनिका खरेदी करायच्या असा प्रश्न पडला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड व पोलिस हवालदार विशाल जांभळे करीत आहेत.