

पिंपरी: जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात घर यादी व घरगणनेच्या मोहिमेत प्रत्यक्ष घरोघरी जाऊन बुधवारपासून (दि. 20) सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने एकूण 6 हजार 702 पर्यवेक्षक व प्रगणक नेमले आहेत. ती मोहीम 14 जूनपर्यंत चालणार आहे.
एक प्रगणक 200 घरांची मोजणी करणार
महापालिकेने या मोहिमेसाठी महापालिका व खासगी शाळेचे शिक्षक तसेच, महापालिकेचे कर्मचारी असे तब्बल सहा हजार 702 कर्मचारी नेमले आहेत. त्यात महापालिका शाळा व आयटीआयचे एकूण 5 हजार 502 शिक्षक आहेत. तर, महापालिकेच्या विविध विभागांचे 1 हजार 400 कर्मचारी आहेत. एक प्रगणक 200 घरांची मोजणी करणार आहे. तर, एका पर्यवेक्षकांकडे तीन प्रगणकांचे नियंत्रण असणार आहे.
5 जूनपर्यंत 95 टक्के नोंदणी केली जाणार
प्रगणकांनी आपल्या मोबाईलमध्ये जनजगणनेचे ॲप शनिवारी (दि. 16) डाऊनलोड केले. दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. 17) लॉगिंग करून नेमून दिलेल्या परिसराचा अचूक नकाशा तपासून घेतला. सोमवारी (दि. 18) परिसरातील घरांचा कच्चा नकाशा तयार करण्यात आला. तर, प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती नोंदवण्यास बुधवारपासून (दि. 20) सुरुवात केली जाणार आहे. दोनशे घरांपैकी 25 मेपर्यंत 40 टक्के, 30 मेपर्यंत 70 टक्के आणि 5 जूनपर्यंत 95 टक्के नोंदणी पूर्ण करण्याचे वेळापत्रक आहे. उर्वरित दिवसांत ज्या घरी लोक भेटली नाहीत, त्या घरांना भेट दिली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मालमत्ता, आहार, घर, वाहनांची माहिती घेतली जाणार
प्रगणक घरोघरी जाऊन कुटुंब, मालमत्ता, आहार, घर, वाहन आदींची माहिती विचारणार आहेत. घराची माहिती, इमारत क्रमांक, मजला, घराचा प्रकार, कोणते धान्य वापरले जाते, मोबाईल क्रमांक, कुटुंबातील सदस्यांची संख्या, कुटुंबप्रमुखाचे नाव, लिंग व जात, घर स्वत:चे की भाड्याचे, खोल्यांची संख्या, घरात राहत असलेल्या विवाहीत जोडप्यांची संख्या आदी माहिती विचारली जाणार आहे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, प्रकाश व्यवस्था, शौचालय व बाथरुमचा प्रकार, स्वयंपाकघर व गॅसजोडणी तसेच, मालमत्तेसंदर्भात रेडिओ, टीव्ही, इंटरनेट, संगणक किंवा लॅपटॉप, फोन, मोबाईल, दुचाकी किंवा चारचाकी वाहन आहे का आदी माहिती नोंदवली जाणार आहे.
प्रत्येक नागरिकाने ही आपली जबाबदारी समजून प्रामाणिक व अचूक माहिती देऊन या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा. जनगणेसाठी संकलित केली जाणारी सर्व माहिती ही पूर्णपणे गोपनीय राखली जाते. ती केवळ शासकीय नियोजनासाठीच वापरली जाते. नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता विश्वासाने व निःसंकोचपणे योग्य माहिती द्यावी. या मोहिमेसाठी जनजागृती करण्यात आली आहे.
सचिन पवार, उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी, महापालिका