

नवलाख उंबरे: स्मार्टफोन, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे पारंपरिक छपाई व्यवसायावर मोठे संकट उभे राहिले आहे. विशेषतः लग्नसराईच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर छापल्या जाणाऱ्या लग्नपत्रिका आता डिजिटल स्वरूपात पाठविल्या जात असल्याने छपाई उद्योगावर त्याचा थेट परिणाम जाणवत आहे.
पूर्वी लग्न, साखरपुडा, वाढदिवस, गृहप्रवेश किंवा धार्मिक कार्यक्रमांसाठी आकर्षक पत्रिका छापून नातेवाईकांच्या घरी जाऊन निमंत्रण देण्याची परंपरा होती. मात्र, आता काळ बदलला असून, व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग््रााम आणि ई-मेलच्या माध्यमातून काही सेकंदांत शेकडो लोकांना आमंत्रण पाठविले जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पत्रिका देण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे.
अनेक कुटुंबांकडून आता फक्त जवळच्या नातेवाईकांनाच छापील पत्रिका दिल्या जातात, तर इतरांना मोबाईलवर डिजिटल कार्ड पाठविले जाते. काही ठिकाणी तर संपूर्ण लग्नपत्रिका व्हिडिओ किंवा ॲनिमेशन स्वरूपात तयार करून सोशल मीडियावर शेअर केली जाते. त्यामुळे खर्चात बचत होत असल्याने नागरिकही डिजिटल पर्यायाला अधिक पसंती देत आहेत.
यामुळे जरी पारंपरिक प्रिंटिंग व्यवसायावर परिणाम होत असला तरी सोशल मीडियावर काम करणाऱ्या तरुणांसाठी मात्र नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. लग्नासाठी खास रिल्स तयार करणे, डिजिटल आमंत्रणाचे फोटो व व्हिडिओ डिझाइन करणे, ॲनिमेटेड ई-कार्ड तयार करणे, तसेच सोशल मीडिया पोस्ट बनविण्याची कामे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. अनेक युवक आता या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवत असल्याचे चित्र दिसत आहे. याचा सर्वाधिक फटका छोट्या-मोठ्या छपाई कारखान्यांना आणि प्रिंटिंग प्रेसचालकांना बसत आहे.
पूर्वी लग्नसराईच्या काळात दिवस-रात्र सुरू असणाऱ्या प्रेसमध्ये आता कामाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. कागद, शाई आणि इतर साहित्यांच्या वाढत्या किमतीमुळे आधीच अडचणीत असलेल्या या व्यवसायावर डिजिटल माध्यमांनी आणखी दबाव वाढविला आहे. तंत्रज्ञानामुळे संवादाची प्रक्रिया जलद आणि सोपी झाली असली तरी त्याचवेळी पारंपरिक छपाई संस्कृती हळूहळू लोप पावत असल्याची खंतही अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.
पूर्वी एका लग्नासाठी हजारो पत्रिका छापल्या जात होत्या. आता त्याच ठिकाणी केवळ शंभर-दोनशे पत्रिकांची ऑर्डर मिळते. अनेक ग््रााहक पूर्णपणे डिजिटल निमंत्रणावर भर देत आहेत.
कैलास भेगडे, छापखाना व्यावसायिक.
लग्नासाठी रिल्स तयार करणे, फोटो एडिटिंग आणि सोशल मीडिया पोस्ट डिझाइन यांसारख्या कामांना मोठी मागणी येत असल्याने आमच्यासारख्या तरुणांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
विशाल रिठे, सोशल मीडिया व्यावसायिक