

विजय जगदाळे
भोसरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वच्छ शहर, सुंदर शहर संकल्पना राबविण्यासाठी मागील काही वर्षांपासून शहरातील कचराकुंड्या हटवल्या आहेत. शहरातील कचराकुंड्या गायब झाल्या; परंतु तेथील कचरा मात्र दररोज तेथेच पडून आहे. यामुळे कचराकुंडीविरहित प्रभाग योजनेला व संकल्पाला नागरिकांकडून तिलांजली देण्यात येत आहे. यामुळे नेमका दोष महापालिका प्रशासनाचा की नागरिकांचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी कचराकुंडीविरहित प्रभाग ही संकल्पना राबविली होती. मात्र, सध्या अनेक प्रभागांमध्ये पूर्वी कचराकुंडी जेथे ठेवली जात होती तेथेच रस्त्याच्या कडेला पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. रस्त्याचा कडेला कचरा पडत असल्याने कचराकुंडीविरहित प्रभाग संकल्पनेला तिलांजली मिळाल्याचे चित्र भोसरी व परिसरात पाहायला मिळत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ई क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या भोसरी प्रभागातील विविध भागांत नागरिकांकडून थेट रस्त्यावर कचरा टाकला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दुर्गंधी, डासांचे प्रमाण आणि अस्वच्छता वाढली आहे. विशेषतः सकाळच्या वेळेत अनेक चौकांत आणि रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येतात. घराघरांतून कचरा संकलनाची व्यवस्था असतानाही काही नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असल्याचे दिसून येत आहे.
कचरा उचलण्यासाठी येणारी गाडी वेळेवर येत नाही. अनेकदा वाट पाहावी लागते. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने रस्त्यावर कचरा टाकावा लागतो, असे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. पालिकेने स्वच्छ शहराचा दावा करत असतानाच प्रत्यक्षात कचराकुंडीविरहीत प्रभागाची संकल्पना धुळीस मिळाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून स्वच्छता व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागरिक, प्रशासनाचे एकमेकांकडे बोट
आरोग्य विभागाकडून कचरा संकलन करण्यासाठी वेळेवर घंटागाडी येत नाही. यामुळे बहुतांश कामगारवर्ग, नोकरदार यांचा नाइलाज होऊन त्यांना रस्त्याच्या कडेला कचरा टाकावा लागत आहे. तर आरोग्य विभाग यासाठी नागरिकांना जबाबदार धरत आहे. कचरा संकलनासाठी गाड्या नियमित पाठविल्या जातात. मात्र, अनेक नागरिक गाडीची वाट न पाहता थेट रस्त्यावर किंवा रिकाम्या जागेत कचरा टाकतात. त्यामुळे स्वच्छता राखण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
या भागात टाकला जातो कचरा
राजमाता जिजाऊ उड्डाणपूल परिसर, चांदणी चौक, पीसी एमटी चौक, भोसरी टर्मिनल समोरील परिसर, आदिनाथनगर येथील मोकळे मैदान, कै. वामनराव गव्हाणे उद्यानासमोर, शांतीनगर परिसर, चक्रपाणी वसाहत, सद्गुरूनगर, लांडेवाडी येथील दुय्यम निबंधक कार्यालय आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक व व्यावसायिक बिनधास्तपणे कचरा टाकतात.
महत्त्वाची जबाबदारी
या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून नागरिकांमध्ये जनजागृती आणि प्रबोधन करण्याची गरज आहे.
स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकानेही आपली जबाबदारी ओळखून सहकार्य करावे.
कचरा संकलनाची प्रभावी व्यवस्था आणि दंडात्मक कारवाई आवश्यक आहे.