

पिंपरी: चोरी करून दुचाकीवरून पळून जात असताना सोसायटीमधील नागरिकांनी चोरट्यांना अडवले. एकजण पिस्तुलाचा धाक दाखवून पळून गेला. तर दुसऱ्या एका चोराला नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना मंगळवारी (दि. 24) सकाळी आठच्या सुमारास भोसरी येथील इंद्रायणीनगरमधील चैतन्य पार्क, साईदर्शन सोसायटीत घडली. सागरसिंग सूरजसिंग ऊर्फ फंट्यास्टिक बावरी अंधरेले (27, रा. गुरु गोविंदसिंग नगर, जालना) असे पकडलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार पळून गेला आहे. याप्रकरणी धर्मेंद्र अमरेंद्र झा (53, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दुचाकीवरून धर्मेंद्र झा यांच्या सोसायटीमध्ये आले. त्यांनी धर्मेंद्र यांच्या फ्लॅटच्या दरवाजाची कडी काढून लॅच तोडले. घरामधील कपाटातून 55 हजार 500 रुपयांची रोकड आणि दोन हजार रुपयांची दोन चांदीची नाणी चोरली. चोर सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीवरून पळून जात असताना नागरिकांना त्यांचा संशय आला. त्यावेळी सोसायटीमधील नागरिकांनी त्यांना अडवले.
सागरसिंग याच्याकडे चाकू होता. त्याला नागरिकांनी पकडले. त्यावेळी त्याने नागरिकांवर चाकूने हल्ला केला. यात सचिन ज्ञानेश्वर पिंगळे आणि ध्वजशेर शाही हे दोघे जखमी झाले. तर सागरसिंग याच्या साथीदाराकडे पिस्तूल होते. त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून ‘तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन पळून गेला. नागरिकांनी सागरसिंग याला चोप दिला. त्यानंतर पोलिसांना बोलावून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
सागरसिंग हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात जालना जिल्ह्यातील सदरबाजार आणि नागपूर जिल्ह्यातील कोडली पोलिस ठाण्यात घरफोडी आणि चोरीचे एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. सागरसिंग याच्याकडून चोरी केलेला ऐवज, घरफोडीचे साहित्य, धमकावण्यासाठी वापरलेला चाकू, तसेच काडतूस व पिस्तुलाचे मॅग्झीन पोलिसांनी जप्त केले. पळून गेलेल्या संशयिताचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
चोरट्यांनी घटनेत वापरलेली दुचाकी चोरीची आहे. संबंधित दुचाकी चोरी प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, सतर्क नागरिकांनी धैर्याने चोरट्यांना अडविले. तसेच त्यांना पकडण्यासाठी झटापट केली. नागरिक आणि चोरट्यांमध्ये भरदिवसा झालेल्या या थरारनाट्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. तपास भोसरी पोलिस करत आहेत.