

लोणावळा: खंडाळा बोरघाटातील अमृतांजन पूल परिसरात सोमवारी (दि. 23) सकाळी सुमोर दहा वाजता कोचीहून गुजरातकडे 21 टन क्षमतेचा प्रोपिलीन गॅस वाहून नेणार्ऱ्या टँकरचा (एनएल 01 एएफ 5040) अचानक बेक निकामी झाला. समोर धोकादायक वळणे आणि खोल दरी असल्याने मोठा अनर्थ ओढवण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत टँकर रस्त्याच्याकडेला असलेल्या आरसीसी रिटेनिंग वॉलला जाणीवपूर्वक धडक दिली. त्यामुळे टँकर जागीच थांबला आणि संभाव्य स्फोट अथवा गॅसगळतीसारखी गंभीर दुर्घटना टळली.
सुरक्षा यंत्रणांची तातडीची धाव
घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिस बोरघाट, आयआरबीची पेट्रोलिंग टीम, देवदूत यंत्रणेची अग्निशमन दल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तसेच हेल्प फाउंडेशनची आपत्कालीन टीम घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षेच्यादृष्टीने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती.
त्यामुळे काही वेळ वाहतूककोंडी झाली होती. हेल्प फाउंडेशनचे केमिकल एक्सपर्ट धनंजय गीध यांनी टँकरची तांत्रिक स्थिती, अंतर्गत दाब आणि गळतीचा संभाव्य धोका यांची बारकाईने तपासणी केली. सुदैवाने कोणतीही गॅसगळती आढळून आली नाही.
मोकळ्या जागेत हलविण्यात आला टँकर
क्रेन आणि पुलरच्या सहाय्याने टँकर अपघातस्थळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील मोकळ्या जागेत सुरक्षितपणे हलविण्यात आला. खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हिरे आणि महामार्ग वाहतूक पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली. आरटीओ अधिकारी रावते यांनी वाहनाची तांत्रिक तपासणी केली असून, खोपोली पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
सलग दुर्घटनांमुळे चिंता वाढली
अलीकडच्या काही दिवसांत प्रोपिलीन गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सलग दुर्घटना समोर येत असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. बोरघाटासारख्या तीव उताराच्या घाटरस्त्यावर बेक फेल झाल्यास भीषण स्फोट, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि पर्यावरणीय हानी होऊ शकते. 3 फेबुवारी रोजी हाच गॅस वाहतूक करणारा टँकर आडोशी बोगद्याजवळ पलटी होऊन 36 तास वाहतूक विस्कळीत झाली होती. आजच्या घटनेमुळे पुन्हा सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने लिकेज न झाल्याने धोका टळला.