

गणेश विनोदे
वडगाव मावळ: एक मुका प्राणीही संपूर्ण महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण करू शकतो, हजारो लोकांच्या डोळ्यांत अश्रू आणू शकतो, असा मावळ तालुक्यातील भारतकेसरी ''ओम्या'' ने गुरुवारी जगाचा निरोप घेतला आणि विशेषतः बैलगाडा क्षेत्रात पोकळी निर्माण करून गेला.
''ओम्या''.. मावळ तालुक्यातील वारंगवाडी येथील प्रसिद्ध बैलगाडा मालक म्हणून ओळख असलेले रामनाथ वारिंगे याचा बैल. वारिंगे परिवारच नव्हे तर बैलगाडा शौकिनांच्या या लाडक्या 'ओम्या' बैलाचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आपल्या लाडक्या ओम्याला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. बैलगाडा क्षेत्रात मावळ तालुक्याचे नाव उंचावणाऱ्या ''भारतकेसरी ओम्या'' बैलास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.
रामनाथ वारिंगे यांनी 'ओम्या'वर केवळ शर्यतीतील बैल म्हणून नव्हे, तर आपल्या मुलाप्रमाणे जिवापाड प्रेम केले होते. त्याचे संगोपन, आहार आणि आरोग्याची ते विशेष काळजी घेत असत. ओम्याशी त्यांचे निर्माण झालेले जिव्हाळ्याचे नाते पाहून अनेकांना त्यांच्यातील भावनिक बंधाची अनुभूती येत असे. बैलगाडा शर्यतीच्या मैदानात 'ओम्या'ने आपल्या दमदार कामगिरीने आणि वेगाने अनेकांची मने जिंकली होती. त्यामुळे तो वारिंगे कुटुंबासह मावळातील बैलगाडा शर्यतप्रेमींच्या विशेष जिव्हाळ्याचा बनला होता.
बैलगाडा शर्यत म्हटली की ''ओम्या''ची बारी अनेकांच्या आठवणीत आहे. घाटात ओम्याची धाव पाहण्यासाठी हजारो बैलगाडा शौकीन गर्दी करत असत. फायनलमध्ये प्रतिस्पर्धी गाड्यांवर मात करत अवघ्या एक- दोन सेकंदांच्या फरकाने आघाडी मिळवत ओम्या आपल्या मालकाची मान अभिमानाने उंचावत असे. त्याचा वेग, धावण्याची शैली आणि रुबाब यामुळे त्याची बारी लागली की घाटावर शौकिनांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण होत असे.
२ जेसीबी, ८ थार, १२ ट्रॅक्टर, १७५ दुचाकी आणि बरंच काही !
ओम्याने गेल्या नऊ वर्षांत बैलगाडा शर्यतींमध्ये एक नंबरची बारी मारून २ जेसीबी, ८ थार, १२ ट्रॅक्टर, ३ बोलेरो गाड्या, १७५ दुचाकी, २५ चांदीच्या गदा आणि तब्बल १५०० पेक्षा जास्त सन्मानचिन्ह मिळवली असून आपला मालक रामनाथ वारिंगे यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात चमकावले होते. इतकेच नाही तर आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेल्या भव्य बैलगाडा शर्यतीमध्ये तब्बल १२०० बैलगाड्यांमध्ये भारत केसरी किताबही पटकावला होता.
सोशल मीडियावर ''ओम्या''चीच चर्चा!
ओम्याच्या निधनाची बातमी कळताच ओम्याचे शर्यतीतील जुने व्हिडिओ, फोटो आणि त्याच्या विजयांच्या आठवणी मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जात आहेत. ''ओम्या तू परत ये'', ''घाटाचा तू ढाण्या वाघ हरपला'', ''बैलगाडा शर्यतीचा बादशहा काळाच्या पडद्याआड'' अशा भावनिक प्रतिक्रिया चाहत्यांकडून व्यक्त होत आहेत.