

पिंपरी: गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांची ३३ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार जानेवारी २०२४ ते २७ ऑगस्ट २०२६ दरम्यान धानोरे फाटा येथे घडला.
याप्रकरणी राहुल भोलेनाथ भोसले (३०, रा. चऱ्होली खुर्द, खेड, जि. पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, भागवत गंगाधर पऱ्हाड (रा. आळंदी, खेड) आणि एका महिला आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दररोज ५०० रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादीसह त्यांच्या ओळखीच्या योगेश वंजारी यांच्याकडून १ लाख ७० हजार, यशवंत गावडे यांच्याकडून १० लाख तसेच शुभम लोखंडे व मोनिका लोखंडे यांच्याकडून ६ लाख रुपये घेतले. अशाप्रकारे एकूण ३३ लाख ४४ हजार ४२५ रुपये गुंतवून घेतल्यानंतर कोणताही परतावा न देता फसवणूक केली. आळंदी पोलिस तपास करीत आहेत.