

बारामती: बारामती नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीचा निकाल रविवारी (दि. 21) जाहीर झाला. अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग््रेासने मोठ्या फरकाने नगराध्यक्षपदाची जागा जिंकली. एकूण 41 पैकी 35 नगरसेवक निवडून आले. तीन ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला एक तर बसपा व रासपला प्रत्येकी एक जागा मिळाली. या दोन्ही पक्षांनी यानिमित्ताने पालिकेत खाते खोलले आहे. भाजप व शिवसेना (शिंदे गट) येथे पूर्णतः निष्प्रभ ठरली.
नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी (अ. प.) पक्षाचे उमेदवार सचिन सदाशिव सातव यांनी मोठा विजय संपादन केला. सातव यांना टक्कर देण्यास विरोधक असमर्थ ठरले. नगराध्यक्षपदासाठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यात सातव यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार ॲड. बळवंत बेलदार पाटील, भाजपचे ॲड. गोविंद देवकाते, शिवसेना (शिंदे गट) सुरेंद्र जेवरे व बसपाचे काळूराम चौधरी यांचे आव्हान होते. परंतु, विरोधी उमेदवारांना पडलेली मते विचारात घेता सातव यांनी एकतर्फीच विजय मिळविला.
नगरसेवकपदाच्या पालिकेत 41 जागा आहेत. त्यात उपमुख्यमंत्री पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आठ जागा बिनविरोध झाल्या होत्या. 33 पैकी 6 जागी त्यांच्या पॅनेलच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. प्रभाग 5 ब मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार ऋतुजा प्रताप पागळे या पराभूत झाल्या. राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवार वनिता अमोल सातकर यांनी त्यांचा पराभव केला. येथे पहिला धक्का राष्ट्रवादीला मोजणीत बसला. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा अनिता गायकवाड या प्रभाग 10 अ मधून पराभूत झाल्या. येथे अपक्ष उमेदवार मनीषा संदीप बनकर या मोठ्या फरकाने विजयी झाल्या. प्रभाग 13 मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार व शहराध्यक्षा आरती मारुती शेंडगे (गव्हाळे) या विजयी झाल्या. राष्ट्रवादी (अ. प.) गटाच्या सुनिता अरविंद बगाडे, बसपाच्या पायल सुनील चव्हाण यांचे आव्हान त्यांनी मोडून काढले. गव्हाळे यांच्या रूपाने या पक्षाला पालिका निवडणूकीत एक जागा पदरात पडता आली. प्रभाग 14 अ मध्ये बसपाच्या संघमित्रा काळूराम चौधरी यांनी विजय खेचून आणला. राष्ट्रवादी (अ. प.) च्या स्वाती आप्पासाहेब अहिवळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या स्नेहा स्वप्निल अहिवळे व भाजपच्या लक्ष्मी मोरे यांना त्यांनी धूळ चारली. यानिमित्ताने बसपाने बारामतीत प्रथमच खाते खोलले.
शहरातील हायहोल्टेज समजल्या जाणाऱ्या प्रभाग 15 ब मध्ये माजी नगराध्यक्ष सुनील पोटे यांचे चिरंजीव यशपाल पोटे यांनी अपक्ष म्हणून निवडून लढवत विजय मिळविला. ज्येष्ठ नेते किरण गुजर यांचे बंधू व राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र बबनराव गुजर यांचा त्यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. गुजर यांना मोठा धक्का या प्रभागात बसला. विशेष म्हणजे प्रभाग 15 अ मध्ये पोटे यांच्या भगिनी मंगल जयप्रकाश किर्वे या राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाल्या आहेत. प्रभाग 20 अ मध्ये अपक्ष उमेदवार नीलेश भारत इंगुले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रथमेश प्रवीण गालिंदे यांचा पराभव केला. या प्रभागात सात उमेदवार रिंगणात होते. इंगुले यांनी यापूर्वी नगरसेवक म्हणून काम केले आहे. यंदा पक्षाने तिकीट न दिल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत पक्षाच्या उमेदवाराला धूळ चारली.
बारामतीच्या मैदानात भाजप व शिंदेंची शिवसेना सपशेल फेल ठरली. नगराध्यक्षपदासह भाजपने 27 जागा लढवल्या तर शिवसेनेने नगराध्यक्षपदासह 12 जागी उमेदवार उभे केले. परंतु, एकाही ठिकाणी भाजप-शिवसेनेला यश मिळाले नाही. शिवसेना (ठाकरे गट), कॉंग््रेासचीही अवस्था तशीच झाली. परंतु, सत्तेत असलेल्या भाजप-सेनेने यंदा बारामतीत एक तरी जागा मिळवून दाखवू, असा चंग बांधला होता. तो सपशेल अपयशी ठरला. मतदारांनी त्यांना साफ नाकारले.