

पिंपरी : दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. नागरिकांमध्ये खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. सोशल मीडियावर सवलतींचा वर्षाव सुरू आहे; मात्र या आनंदोत्सवावर विरजण घालण्यासाठी सायबर चोरटे सज्ज झाले आहेत. ‘गिफ्ट लिंक’, ‘बंपर ऑफर’ आणि ‘कॅशबॅक’ च्या आमिषाने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (Latest Pimpri chinchwad News)
अनोळखी लिंक किंवा संदेशावर क्लिक करू नका.
ओटीपी कोणालाही सांगू नका.
बँक खाते, कार्ड किंवा क्रेडिट माहिती फोनवर देऊ नका.
केवळ अधिकृत ॲप्स आणि वेबसाइटवरूनच व्यवहार करा.
फसवणूक झाल्यास त्वरित 1930 हेल्पलाईन किंवा लूलशीलीळाश.र्सेीं.ळप वर तक्रार नोंदवा.
दिवाळीच्या काळात येणारे ‘गिफ्ट कूपन’, ‘कॅशबॅक’, ‘लोन अप्रूव्ह’ संदेश 90 टक्के वेळा संशयास्पद असतात.
ई-कॉमर्स फसवणुकीत ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या प्रसिद्ध कंपन्यांच्या नावाने बनावट वेबसाइट तयार केल्या जातात. त्या साइटवर आकर्षक ऑफर आणि मोठ्या सवलती दाखवून नागरिकांकडून पेमेंट घेतले जाते; मात्र ऑर्डर केल्यानंतर वस्तू मिळत नाही किंवा निकृष्ट दर्जाचा माल पाठवला जातो. गिफ्ट लिंक स्कॅममध्ये नागरिकांच्या मोबाईलवर ‘दिवाळी बोनस गिफ्ट हॅम्पर मिळवा’ किंवा ‘5000 कॅशबॅक जिंका’ असे संदेश येतात. त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक होताच मोबाईलमध्ये ‘मालवेअर’ घुसवले जाते. त्यामुळे मोबाईल बँकिंगची माहिती गुन्हेगारांच्या हाती लागते आणि काही क्षणांत खाते रिकामे होते.
सायबर पोलिसांनी ‘सायबर सुरक्षित दिवाळी’ हे अभियान हाती घेतले आहे. सोशल मीडियावर जनजागृती पोस्टर, माहितीपर व्हिडिओ आणि सावधानतेचे संदेश प्रसारित केले जात आहेत. शहरातील शाळा, महाविद्यालये, बँका आणि हाउसिंग सोसायट्यांमध्येही जनजागृती सत्रे घेतली जात आहेत. सायबर गुन्हे हा केवळ तांत्रिक विषय नाही, तर सामाजिक जबाबदारीचा मुद्दा आहे. प्रत्येक नागरिकाने स्वतः खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे सायबर ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
सायबर गुन्हे आता केवळ शहरापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तारत आहेत. मात्र, प्रत्येक नागरिकाने स्वतः खबरदारी घेतली, तर मोठ्या प्रमाणात नुकसान टाळता येईल. मानसोपचार तज्ञ पूजा मिसाळ यांच्या मते, उत्सवाच्या काळात भावनिक आवेग आणि उत्साहामुळे निर्णयक्षमता कमी होते. त्यामुळेच गुन्हेगार ‘मर्यादित कालावधीतील ऑफर’ किंवा ‘आता लगेच नोंदणी करा’ अशा शब्दांचा वापर करतात. नागरिकांनी अशा संदेशांकडे दुर्लक्ष केले, तर फसवणुकीची साखळी आपोआप खंडित होईल.
दिवाळीचा काळ सायबर गुन्हेगारांसाठी सोन्याचा हंगाम ठरतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे. नागरिक भेटवस्तू, सवलती आणि बंपर ऑफरच्या मोहात अडकतात, आणि गुन्हेगार याच भावनेचा फायदा घेत गंडा घालतात. अनेकांना फसवणूक झाल्यानंतर दिवाळीचा फराळही गोड लागत नाही, अशी परिस्थिती मागील वर्षी पहावयास मिळाली.
मागील वर्षी ऐन दिवाळीत सायबर चोरट्यांनी विविध पद्धतींनी नागरिकांना गंडा घातला होता. या सर्वांमध्ये तब्बल 17 वेगवेगळ्या मोडस ऑपरेन्डी (गुन्हे पद्धती) वापरल्याचे समोर आले आहे. त्यातील मोठा भाग ऑनलाइन खरेदी, गिफ्ट ऑफर आणि केवायसी अपडेट यांसंबंधित आहे. ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या ‘फेस्टिव्हल सीझन’ दरम्यान दररोज सायबर फसवणुकीच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवल्या जात आहेत.
बँक किंवा केवायसी अपडेटच्या नावाखालीही मोठ्या प्रमाणावर फसवणूक सुरू आहे. ‘तुमचे खाते बंद होणार आहे’ किंवा ‘केवायसी अपूर्ण आहे’ अशा संदेशांद्वारे ओटीपी आणि कार्डची माहिती घेतली जाते. काही टोळ्या ‘रिवॉर्ड पॉइंट’, ‘लोन अप्रूव्हल’ किंवा ‘गुंतवणूक दुप्पट’ होण्याच्या आमिषाने लोकांना पैसे ट्रान्सफर करायला प्रवृत्त करतात. यामागे रॅकेट्स कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.
दिवाळीचा काळ म्हणजे फसवणुकीसाठी सर्वात सक्रिय काळ आहे. नागरिकांनी कोणतीही लिंक उघडण्यापूर्वी तिचा स्त्रोत पडताळावा. बँक कर्मचारी म्हणून फोन करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये. संशयास्पद व्यवहार दिसल्यास त्वरित 1930 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. जागरूकता हीच फसवणुकीविरुद्धचे खरे शस्त्र आहे.
डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त (गुन्हे), पिंपरी-चिंचवड
सायबर गुन्हे करणाऱ्या अनेक टोळ्या उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणात कार्यरत असून शहरातील नागरिकांना लक्ष्य करत आहेत. काहीजण परदेशातून तझछ वापरून हे प्रकार घडवतात. मागील वर्षी दिवाळीच्या काळात लाखो रुपयांची फसवणूक झाली होती, तर यावर्षीही अशा प्रकरणांचा आलेख झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.