

पिंपरी: विद्यार्थ्यांचे ‘अपार आयडी’ अर्थात ‘ऑटोमेटेड परमनंट ॲकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री क्रमांक’ काढण्यासाठी अद्याप नोंदणीच केली नसल्याची माहिती समोर आली आहे. आता हे काम करण्यासाठी शिक्षण विभागाने 30 जानेवारीची मुदत दिली आहे. तसेच दररोज अपार आयडीसंदर्भात अहवाल घेण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शहरात विद्यार्थ्यांचे ’अपार आयडी’ काढण्याचे काम पूर्ण झाले असून, त्यातील 95 टक्के विद्यार्थ्यांचे ’आधार’ पडताळणीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही शहरातील अनेक विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच केली नाही. त्यामुळे केंद्रे शिक्षण सचिवांनी यावर बैठक घेऊन ’अपार आयडी’चे काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा, तालुका केंद्र स्तरावर शिबिर घेऊन प्रलंबित विद्यार्थ्यांचे ’अपार आयडी’ काढण्याचे काम पूर्ण करावे, असे निर्देश देण्यात आले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्यांचा ’अपार आयडी’ तयार करणे आवश्यक आहे. त्यामुळे ’अपार आयडी’ काढताना काही अडचणी येत असल्यास प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, अशाही सूचना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी दिल्या आहेत.
परीक्षा अर्ज भरता येणार नाही
‘अपार आयडी’ असल्याशिवाय सीईटी परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही. सर्व प्रवेश पूर्वपरीक्षेसाठी ‘अपार आयडी’ बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना ‘अपार आयडी’ काढावाच लागणार आहे.
विद्यार्थ्यांना बारा अंकी डिजिटल ओळख
‘अपार आयडी’ म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला बारा अंकी डिजिटल ओळख दिली जाते. ज्यामुळे त्यांचे सर्व शैक्षणिक क्रेडिट्स, पदव्या आणि पुरस्कार एकाच ठिकाणी डिजिटल स्वरुपात जतन केले जाते. राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत ही नोंद केली जात असून, ही प्रणाली शैक्षणिक प्रवासात सुलभता व पारदर्शकता दर्शवते.