

मंचर: आंबेगाव तहसील कार्यालयाने अवैध गौणखनिज वाहतुकीविरोधात कठोर मोहीम सुरू केली आहे. यादरम्यान दोन डंपरविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी याबाबत माहिती दिली.
तालुक्यातील विविध भागांत अवैध माती, मुरूम व वाळू वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. तहसील कार्यालयाच्या वतीने सहा मंडळांमध्ये सहा प्रतिबंधक पथके स्थापन करण्यात आली आहेत.
आंबेगाव मंडळ (पेसा क्षेत्र), निरगुडसर मंडळ-पारगाव मंडळ परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान अवैध माती व मुरूम वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान दोन डंपरमधून अवैध गौणखनिज वाहतूक होत असल्याचे आढळून आले. संबंधित वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
तालुक्यातील विविध भागांत अवैध खनिज उत्खनन व वाहतुकीच्या तक्रारी येत असल्याने महसूल प्रशासनाने ही मोहीम अधिक तीव करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनीही अवैध वाळू, माती किंवा मुरूम वाहतूक होत असल्याची माहिती तत्काळ तहसील कार्यालयाला द्यावी, असे आवाहन केले आहे. तक्रार करणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आंबेगाव तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथके कार्यरत केली आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनीही माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे.
डॉ. सचिन वाघ, तहसीलदार आंबेगाव तालुका