

आकुर्डी: पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम सुरू असल्याने आकुर्डी येथील पीएमपीएमएलच्या बस थांब्याचे स्थलांतर करण्यात आले आहे; परंतु स्थलांतरित जागेवर निवाराशेड नसल्याने केवळ रस्त्याच्या कडेला भर उन्हात प्रवाशांना उभा राहून बसची वाट पाहण्याची वेळ येत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, अपंग, लहान मुले तसेच इतर प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
पीएमपीएमलच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा परिसरातील नागरिकांना सार्वजनिक बस सुविधा दिली जाते. नागरी बससुविधा अधिक सुखकारक होण्यासाठी व उत्पन्न वाढीसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात; परंतु पुणे मेट्रोच्या अनेक ठिकाणच्या बांधकामामुळे बऱ्याच ठिकाणी बसथांबे उद्ध्वस्त केले गेले असून, आकुर्डी खंडोबा माळ येथील बसथांबा मेट्रोच्या कामामुळे ठिकाणामध्ये बदल केला गेला आहे. यामुळे किंवा इतर कारणांमुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमान 40/42 अंशावर असताना प्रवाशांना मात्र उन्हाच्या झळा सहन करत बसची वाट पाहवी लागत आहे.
मेट्रोची कामे करण्यासाठी बरेच बसथांबे उखडून टाकण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी बसथांबा आहे, परंतु निवाराशेड नाही. यामुळे संबंधित प्रशासनाने स्थलांतरित ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात शेड उभारणे गरजेचे आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष केल्याने मागील काही महिन्यांपासून नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे.
प्रवाशांना अपघाताचा धोका
मुंबई-पुणे महामार्गावरती असलेला हा बसथांबा प्रवाशांसाठी धोकादायक ठरू लागला आहे. या ठिकाणी अत्यंत अरुंद रस्ता आहे. पुणे महा मेट्रोचे काम जोमात सुरू असून, रस्ता खड्डेमय झाला आहे. एमपीएमएलच्या प्रवाशांना उभे राहण्यासाठी सुरक्षित जागा नसल्याने व अरुंद रस्ता असल्याने बस पकडण्यासाठी उन्हातान्हात प्रवाशांना धावपळ करावी लागते. यामुळे वेगाने येणार्या इतर वाहनांपासून अपघाताची धोका संभवत आहे. या धावपळीमध्ये अनेक वेळा अनपेक्षित किरकोळ अपघातही घडतात. त्यामुळे बस थांबा पूर्ववत जागेवर येईपर्यंत नवीन बसशेड उभारून प्रवाशांची गैरसोय दूर करणे गरजेचे आहे.
जवळजवळ वर्षभरापासून या ठिकाणी ऊन, वारा, पाऊस यांना तोंड देत पीएमपी प्रवासी प्रवास करत आहेत. उन्हाळ्यात आम्हाला बसने प्रवास करण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी उभा राहून बसची वाट बघावी लागते. बरेच वेळा सिग्नल अथवा वाहतूक कोंडीमुळे आम्हाला बस पकडण्यासाठी धावपळ करणे भाग पडते. हा त्रास थांबविण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन येथे बस थांबा उभारणे गरजेचे आहे.
आदिल सय्यद, नोकरदार, नियमित