

पिंपरी: आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावरही जाणवू लागला आहे. विशेषतः इम्पोर्टेड फळांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असून, पुण्यातील मोशी उपबाजारात सफरचंद, कीवी, ड्रॅगन फ्रूट, अवोकॅडो, ब्लूबेरी यांसारख्या परदेशी फळांचे दर गेल्या काही आठवड्यांत लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र आहे.
वाढलेले वाहतूक खर्च, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरलेले मूल्य आणि आयात प्रक्रियेतील अडथळे यामुळे फळांच्या बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे.मोशी उपबाजारातील फळविक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी 200 ते 250 रुपयांपर्यंत मिळणारे कीवी आता 350 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. अमेरिकन सफरचंदाच्या पेट्यांमध्ये 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली असून, ड्रॅगन फ्रूट आणि ब्लूबेरीसारख्या फळांचे दरही ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत.
काही विक्रेत्यांनी सांगितले की, माल वेळेवर उपलब्ध होत नसल्याने मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. फळ विक्रेते संतोष शिंदे यांनी सांगितले की, युद्धामुळे आंतरराष्ट्रीय शिपिंग सेवा आणि कंटेनर वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आयात खर्च वाढला असून त्याचा थेट परिणाम बाजारभावावर होत आहे.
तर विक्रेत्यांनी सांगितले की, ग्राहक आता इम्पोर्टेड फळांऐवजी स्थानिक फळांकडे वळत आहेत. दर वाढल्यामुळे विक्रीतही घट झाली आहे. दरवाढीमुळे मध्यमवर्गीय ग्राहकांची चिंता वाढली असून, सणासुदीच्या काळात फळांची खरेदी मर्यादित होत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी ही फळे आता सर्वसामान्यांसाठी महागडी ठरत आहेत.
व्यापाऱ्यांच्या मते, जागतिक परिस्थिती लवकर सुधारली नाही तर आगामी काळात इम्पोर्टेड फळांचे दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक फळांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.