

उमेश सणस
पिंपळे गुरव: सांगवी करसंकलन विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. आर्थिक वर्ष 2026-27 साठी मालमत्ता करसंकलन मोहीम जोरात सुरू असताना पिंपळे गुरवमध्ये चुकीच्या मालमत्ता कर बिलांचे वितरण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कुठे नावांचा गोंधळ, तर कुठे कराच्या रकमेमध्ये तफावत आढळून आल्याने प्रामाणिक करदाते नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सांगवी करसंकलन कार्यालयाकडून मालमत्ता धारकांना महिला बचत गटाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेट देत मालमत्ता कर बिलांचे वितरण करण्यात येत आहे. मात्र, या वितरण प्रक्रियेत गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. अनेक नागरिकांना दुसऱ्याच आडनावाची बिले देण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. नाव आमचे आणि आडनाव दुसऱ्याचे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संभमाचे वातावरण आहे. याचबरोबर कराच्या रकमेमध्येही मोठा घोळ झाल्याचे समोर आले आहे. काही नागरिकांना नेहमीपेक्षा अव्वाच्या सव्वा रकमेची बिले मिळाली आहेत तर काहींना अपेक्षेपेक्षा खूपच कमी रकमेची आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे नेमका कर किती भरायचा, याबाबत नागरिक गोंधळून गेले आहेत.
प्रशासनाची चूक, नागरिकांत संभम
विशेष म्हणजे दुबार आलेली बिले कमी करून घेण्यासाठी नागरिकांना स्वतंत्र अर्ज करण्यास सांगितले जात आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे निर्माण झालेल्या गोंधळानंतरही दुरुस्तीसाठी नागरिकांनाच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागत असल्याने पालिकेच्या या बेजबाबदार कारभारचा नागरिकांना फटका बसत आहे. प्रशासनाच्या चुकीची शिक्षा आम्ही का भोगायची? बिले छापताना योग्य पडताळणी झाली नव्हती का? दुरुस्तीसाठी आमचा वेळ आणि पैसा का वाया घालवला जात आहे? असे संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, मालमत्ताकर बिलांमधील या सावळागोंधळामुळे शहरात संभमाचे वातावरण निर्माण झाले असून, महापालिकेने तातडीने सर्व चुकीची बिले दुरुस्त करून अचूक बिले नागरिकांना द्यावीत तसेच करदात्यांची होणारी गैरसोय थांबवावी, अशी जोरदार मागणी आता पिंपळे गुरवमधून होत आहे.
प्रशासनाकडून प्रिंट मिस्टेकचे कारण
चुकीची बिले दुरुस्त करून घेण्यासाठी नागरिकांना सांगवी येथील मुख्य करसंकलन कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. कार्यालयात नागरिकांची गर्दी होत असून, प्रशासनाकडून मात्र प्रिंटिंग मिस्टेकचे कारण पुढे केले जात आहे. सांगवी करसंकलन कार्यालयातून वरूनच प्रिंटिंग मिस्टेक झाली असल्याने चुकीची बिले वितरित झाले असे सांगण्यात येत आहे.
चुकीच्या बिलांचे वाटप होत असेल तर याची पडताळणी केली जाईल. बचत गटांना हे काम दिले आहे त्यांनी अशा प्रकारे काम करू नये. आमची रोज बैठक होत असते त्यामध्ये हा विषय मांडला जाईल. बचत गटामार्फत चुकीची बिले वाटप होत असल्याचे आढळल्यास संबंधित महिलांचे पेमेंट थांबवले जाईल. चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल.
सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.
चुकीच्या मिळकतकर बिलांमुळे नागरिकांमध्ये संभम आहे. अनेक नागरिक वर्षानुवर्ष नियमितपणे कर भरत आहेत, तरीही अचानक काहींना वाढीव तर काहींना कमी बिले येत आहेत. काही नागरिकांना तर दुबार वाढीव बिलेही मिळाली आहेत. या चुकीच्या बिलांमुळे नागरिकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत असून, बिल दुरुस्तीसाठी वारंवार कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. दुबार किंवा वाढीव बिल कमी करण्यासाठी प्रशासनाकडून अर्ज करण्यास सांगितले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
गणेश काशीद, पिंपळे गुरव.