Thergaon Hospital Problems: थेरगाव रुग्णालयात मूलभूत सुविधांचा अभाव; रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय

पाणी, पार्किंग, कॅन्टिन व निवारा शेड नसल्याने नागरिक त्रस्त; मूलभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह
Thergaon Hospital Problems
Thergaon Hospital ProblemsPudhari
Published on
Updated on

वर्षा कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापलिकेच्या थेरगाव रुग्णालयात काळेवाडी, ताथवडे, हिंजवडी, रावेत, किवळे, मामुर्डी, पुनावळे, जुन्नर, खेड, मंचर आणि शहराच्या आसपाच्या ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, रुग्णालयात पाणी, पार्किंगची समस्या आहे. तसेच, कॅन्टिन, निवारा शेडची सोय नसल्याने रुग्ण व कर्मचाऱ्यांची गैरसोय होते.

Thergaon Hospital Problems
Pimpri Chinchwad Crime Control: पिंपरी-चिंचवडमध्ये 368 तडीपार गुन्हेगार; एक्स-ट्रॅकर यंत्रणा निष्प्रभ, नागरिकांत भीती

थेरगाव रुग्णालय हे 340 बेड क्षमतेचे आहे. यामध्ये 54 बेड महिलांसाठी, 25 बेड आयसीयू, 10 डायलिसीससाठी आहेत. पूर्वी उपचारासाठी चिंचवडचे तालेरा रुग्णालयजवळ असल्याने या परिसरातील नागरिकांना उपचारासाठी येथे यावे लागत होते. थेरगाव रुग्णालय झाल्यापासून आसपासच्या नागरिकांची सोय झाली आहे. रुग्णालयात दररोज 1200 जण ओपीडीमध्ये उपचारासाठी येतात.

पार्किंगची मोठी समस्या

रुग्णालयाला दोन प्रवेशव्दार आहेत. प्रवेशव्दारातून आत गेले की लगेच पार्किंग आहे. पार्किंगच्या ठिकाणी दुचाकी आणि चारचाकीसाठी पट्टे मारलेले नाहीत. त्यामुळे येणारे नागरिक बेशिस्तपणे वाहने लावतात. त्यामुळे मोठी वाहने, रुग्णवाहिका, रुग्णालयातील कचरा नेणाऱ्या गाड्या यांना अडथळा होतो. वाहने लावण्याच्या सूचना करताना आणि स्वत: वाहने बाजूला सरकवताना सुरक्षा रक्षकांची दमछाक होते. सुरक्षा रक्षकांच्या केबिनमध्ये वीज नसल्यामुळे ऐन उन्हाळ्यात सुरक्षा रक्षकांचे हाल होत आहेत.

Thergaon Hospital Problems
Pimpri Mayor Threat: पिंपरीचे महापौर रवी लांडगे यांना धमकी; ‘समाधान’ हेल्पलाईनवर फोन करणारा ताब्यात

पाणी गळती अन्‌‍ टंचाई

रुग्णालयातील पाईप लिकेज असल्याने बऱ्याचदा पाणी वाहून जाते. त्यामुळे स्वच्छतागृहात पाणी नसते. याठिकाणी गरोदर आणि प्रसूती झालेल्या महिला उपचारासाठी येतात. तसेच, इतर रुग्णांना स्वच्छतागृहात पाणी नसल्याने गैरसोय होते. स्वच्छतागृहात पाण्याचे मोठे ड्रम भरून ठेवावे लागतात. रुग्णालयास टँकरने पाणीपुरवठा केला जातो.

स्वच्छतागृहाची दुरवस्था

स्वच्छतागृहामधील वॉश बेसीनमध्ये नळ गायब आहेत. वॉश बेसीनचा उपयोग सामान ठेवण्यासाठी केला जातो. प्रेशर पाईप आणि नळदेखील तुटलेले आहेत. पाणी टचांईमुळे स्वच्छतागृहांत स्वच्छता नसल्याने दुर्गंधी येते.

Thergaon Hospital Problems
Pimpri Chinchwad Census 2027: पिंपरी-चिंचवडमध्ये जनगणना 2027 मोहिमेला सुरुवात

कॅन्टिनची व्यवस्था नाही

रुग्णालयात कॅन्टिनची व्यवस्था नाही. तसेच, रुग्णालयाच्या आसपासही खाण्या-पिण्याच्या सुविधा नाहीत. त्यामुळे रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना खाण्याची सोय करण्यासाठी लांब जावे लागते. कॅन्टिन नसल्याने चहा, कॉफी किंवा अल्पोपहाराची जवळ सुविधा नाही.

निवारा शेड नाही

रुग्णालयात दाखल रुग्णांबरोबर असलेल्या नातेवाईकांना रात्री झोपण्यासाठी निवारा शेड नाही. नातेवाईक रुग्णालयाच्या पॅसेजमध्ये झोपतात. याठिकाणी महिला असल्यास त्यांना गैरसोयीचे वाटते. त्यामुळे दिवसादेखील बाकांवर बसल्या बसल्या झोप काढतात किंवा निवांत जागा पाहून विसावा घेतात. याबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Thergaon Hospital Problems
Pimpri Chinchwad Garbage Issue: भोसरीत कचराकुंडीविरहित संकल्पना अपयशी; रस्त्यावर कचऱ्याचे ढीग

पॅसेजमधील फॅन गायब, उकाड्याने हैराण

रुग्णालयात ॲडमीट रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी वॉर्डच्याबाहेर आसनव्यवस्था आहे. याठिकाणी असणारे काही फॅन काढून नेले आहेत. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो.

मरुग्णालयात कॅन्टिन नसल्यामुळे लांबून येणाऱ्यांचे हाल होतात. आम्हाला घरून डबा आणणे शक्य होत नाही. दरवेळी खाण्या-पिण्यासाठी बाहेर चालत जावे लागते.

सुदर्शन तरटे, नागरिक

निवारा शेड नसल्याने दिवसा बाकड्यांवर बसावे लागते. तर, रात्री तिथचं कुठं तरी अंथरुण टाकून झोपते. येथे फॅनदेखील कमी आहेत. महिलांसाठी तरी काही वेगळी सोय हवी होती.

सुषमा शेवाळे, नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news