

पुणे : नवले पुलावर एलिव्हेटेड ब्रिज उभारण्यास केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज मंजुरी दिली. येथे सातत्याने होणाऱ्या प्राणघातक अपघातांमुळे या ठिकाणी एलिव्हेटेड पूल तयार करण्याची मागणी केली जात होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पुढाकाराने दिल्लीत आज गडकरी यांच्यासोबत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नवले पुलावरील अपघातांची मालिका, वाहतूक कोंडी, नागरिकांचे जाणारे बळी आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न, याबाबत सविस्तरपणे चर्चा झाली.
आजच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. या बैठकीत एलिव्हेटेड ब्रिजची मागणी करण्यात आली. त्यावर गडकरी यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून एलिव्हेटेड ब्रिजच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिली. तसेच सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे स्पष्ट आदेशही देण्यात आले.