

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत आजी-माजी आमदारांनी उमेदवारांचा प्रचार केला नाही. काही जण निवडणूक न लढता मैदानाच्या बाहेर राहणे चुकीचे होते. आता तरी तोंडे उघडा, चुकीच्या कामाविरोधात आक्रमकपणे बोला, अशी सक्त सूचना राष्ट्रवादी काँग््रेासचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत केली आहे.
महापालिकेची निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी स्वतः उमेदवार ठरविण्यापासून प्रचाराची धुरा सांभाळली. महापालिकेतील गैरकारभाराचे आरोप करीत भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना लक्ष्य केले होते. संपूर्ण शहर पिंजून काढत 15 पेक्षा अधिक जाहीर सभा घेतल्या. बैठका व मेळावा घेतल्या.
त्यानंतरही राष्ट्रवादीला अपयश आले. 128 पैकी केवळ 37 नगरसेवक निवडून आले. पवार यांनी सोमवारी (दि.19) नवनिर्वाचित 37 नगरसेवकांची पुण्यात बैठक घेतली. निवडून आलेल्या नगरसेवकांचे अभिनंदन केले. निवडणुकीचा आढावा घेतला. पराभवावर चर्चा केली. नगरसेवकांना मार्गदर्शन केले. त्या वेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले की, निवडणूक प्रचारात आजी-माजी आमदारांनी उमेदवारांचा प्रचार केला नाही. काही जण निवडणूक न लढता मैदानाच्या बाहेर राहणे चुकीचे होते. स्थानिक पदाधिकारी चुकीच्या कारभाराविरोधात काहीच बोलले नाहीत. इतर उमेदवारांच्या प्रचारात दिसले नाहीत. आपल्या प्रभागातच गुंतून राहिले. आता, तरी तोंडे उघडा, चुकीच्या कामाविरोधात बोला, अशा सक्त सूचना पवार यांनी पदाधिकारी व नगरसेवकांना दिले आहेत.
पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्यांचे कौतूक करत पवार म्हणाले की, नवीन पिढी घडवायची आहे. जुन्या-जाणत्यांचे मार्गदर्शन घ्यावे. सभागृहाचे कामकाज समजून घ्या. महापालिका सभेला वेळेवर उपस्थित रहा. कामकाजात सहभाग घ्या. चुकीच्या कामाविरोधात आवाज उठवा. पक्षाच्या पराभवाने खचून जावू नका. जोमाने काम करा. मी तुमच्या पाठीशी उभा आहे, अशी ग्वाही त्यांनी नगरसेवकांना दिली.