

पिंपरी: गुन्हे नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण आणि सार्वजनिक सुरक्षेला नवे बळ देणाऱ्या एआय आधारित एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पास पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी अखेर शासनाच्या उच्चस्तरीय समितीची (एचपीसी) मान्यता मिळाली आहे. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवल्याने शहराची सुरक्षा आणखी अभेद्य होणार आहे.
वेगाने नागरीकरण होत असलेले पिंपरी-चिंचवड, वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि आयटी हब यामुळे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अधिक संवेदनशील बनत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयाने तंत्रज्ञानाधारित पोलिसिंगवर भर देत हा शहराव्यापी सीसीटीव्ही प्रकल्प प्रस्तावित केला होता. त्याला आता अधिकृत मान्यता मिळाली आहे.
तीर्थक्षेत्रस्थळी गर्दीवर नियंत्रणास मदत
देहू व आळंदी या धार्मिक तीर्थक्षेत्रांमध्ये, तसेच सण-उत्सव व पालखी मिरवणुकीदरम्यान होणाऱ्या लाखोंच्या गर्दीचे नियोजन आणि वाहतूक नियंत्रण करण्यासाठीही या प्रकल्पाचा मोठा उपयोग होणार आहे. एआय आधारित प्रगत व्हिडिओ ॲनालिटिक्सच्या साहाय्याने संशयास्पद हालचाली, वाहतूक नियमभंग, गर्दीचा दबाव आणि आपत्कालीन परिस्थितीवर तत्काळ प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.
एआय-आधारित सीसीटीव्हीचे फायदे
एआय तंत्रज्ञानामुळे संशयास्पद हालचालींची ओळख, वाहतूक नियमभंग शोधणे, गर्दीचा ताण ओळखणे आणि गुन्हे तपासात त्वरित मदत मिळते. त्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन कारवाई अधिक अचूक होणार आहे.
आयटी हब, एमआयडीसी परिसरात विशेष लक्ष
या प्रकल्पाअंतर्गत पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी मिशन आणि महापालिकेमार्फत आधी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे एकाच एकात्मिक प्रणालीत जोडले जाणार आहेत. तसेच, महत्त्वाच्या आणि अद्याप कव्हरेज नसलेल्या भागांत नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. विशेषतः चाकण, तळेगाव आणि भोसरी एमआयडीसी, तसेच हिंजवडी आयटी हब येथे सीसीटीव्हीच्या माध्यमातून कडक निगराणी ठेवली जाणार आहे.
एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर
नव्याने उभारण्यात येणाऱ्या पोलिस आयुक्तालयात अत्याधुनिक एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर स्थापन केले जाणार असून, येथील थेट दृश्ये परिमंडळ पोलिस उप-आयुक्त, वाहतूक विभाग आणि पोलिस ठाण्यांना उपलब्ध राहणार आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प अंमलबजावणी समिती (पी आय सी) स्थापन करण्यात आली असून, त्यात पीसीएमसी, पीएमआरडीए, स्मार्ट सिटी, एमआयडीसी आणि पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची सुरक्षा अधिक सक्षम, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या दृष्टीने एआय आधारित एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्प महत्त्वाचा टप्पा आहे. शासनाच्या उच्चस्तरीय समितीची मान्यता मिळाल्याने या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी शक्य होणार आहे. या प्रणालीमुळे गुन्हे नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण तसेच आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देणे अधिक सुलभ होईल. स्मार्ट आणि सुरक्षित शहराच्या दिशेने हे एक निर्णायक पाऊल आहे.
विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड