

दिवे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील कोडीत गावात बहुतांश शेतकरी गाजराचे उत्पादन घेतात. गावाच्या पश्चिमेला गराडे धरण असल्याने विहिरींची पाणीपातळी बर्यापैकी टिकून असते. यातूनच शेतकरी अगदी वर्षभर गाजराचे उत्पादन घेतात आणि यातूनच शेतकरी नेहमीच नवनवीन प्रयोग करीत आहेत. गाजराचे उत्पादन तसे पाहता दिल्ली, हरियाणा राज्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु या राज्यातील गाजर हे साधारण ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रातील बाजारपेठेत दाखल होतात. त्यामुळे दिवाळीपर्यंत स्थानिक शेतकर्यांना गाजराचे चार पैसे हमखास हातात पडतात. काढणीपश्चात गाजराला धुवून बाजारपेठेत पाठवावे लागते.
यात शेतकर्यांचा बराच वेळ खर्ची पडतो. यावर उपाय म्हणून येथील शेतकर्यांनी हरियाणा राज्यात जाऊन माहिती घेतली असता गाजर धुण्यासाठी यंत्र उपलब्ध असल्याचे समजले. मग हे यंत्रदेखील स्थानिक शेतकर्यांनी खरेदी केले. सध्या गाजर धुण्यासाठी या यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. आतापर्यंत गाजराचे उत्पादन घेताना ट्रॅक्टरच्या साहाय्याने जमिनीची खोलवर नांगरट करून बेड तयार केले जात. नंतर बेडवर बियाणे टाकून कुटळले जात असे.
परंतु, यावरदेखील उपाय शोधत कोडीत येथील प्रगतिशील शेतकरी अमोल बडधे यांनी हरियाणा राज्यातून गाजर पेरणी यंत्र खरेदी केले आहे. अमोल बडधे यांची वडिलोपार्जित 11 एकर शेती आहे. त्यात ते नेहमी गाजराचे उत्पादन घेतात. या यंत्राने वेळ आणि मजुरीत प्रचंड बचत झाली असल्याचे बडधे यांनी सांगितले. हे यंत्र एकाच वेळी बेड देखील काढून गाजराची एकसारखी पेरणी करीत बेड सपाटदेखील करते. त्यामुळे मजुरी खर्च वाचून उत्पादनात वाढ झाल्याचे बडधे यांनी सांगितले.
हेही वाचा