

नसरापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गणेशोउत्सव आणि सलग जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे चाकरमानी व व्यापारीवर्ग सुट्टीसाठी घराबाहेर पडले आहेत. पुणे – बंगळूर महामार्गावरील खेड शिवापुर टोलनाका, कापूरहोळ, खंबाटकी घाटात वाहनाच्या लांब रांगा लागल्या असून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे., तर प्रवाशांच्या जवळपास दहा ते पंधरा वाहने बंद पडली आहे. यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सोसावा लागत आहे.
शनिवार व रविवार या सलग सुट्टयांमुळे महामार्गावर वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे रविवारी (दि. १७) महामार्गावर खेड शिवापूर टोलनाका येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले असून खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी होऊन वाहने धिम्यागतीने सुरू आहे. महामार्गावर वाहनांची ठिकठिकाणी मोठी कोंडी झाली होती. सलग दोन दिवस या महामार्गावर वाहतूकीची कोंडी होत आहे. दरम्यान, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पुणे, मुंबई येथील पर्यटक आणि गणेशभक्त आपआपल्या गावी जाण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने महामार्गावर वाहतूकीचा बोजवारा उडाला. रविवारी महार्गावर सकाळपासूनच वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या. खंबाटकी घाटातही वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती. त्यामुळे १० मिनिटात पार होणारा खंबाटकी घाट पार करण्यासाठी तब्बल दिड तास मोजावे लागत होते. शिवाय, प्रवाशांचीही मोठी गर्दी असल्याने महामार्गावरही ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
हेही वाचा