

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : चालू वर्षी उसाला पहिला हप्ता 3 हजार 100 रूपये जाहीर केल्याशिवाय कारखान्यांचे धुराडे पेटणार नाहीत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस दराबाबत झालेल्या बैठकीत दिला आहे.
शेवगाव येथील तहसील कार्यालयात तहसीलदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना, ऊस उत्पादक शेतकरी, सहसंचालक प्रतिनिधी व कारखाना प्रतिनिधी यांची ऊस दराबाबत बैठक झाली. बैठकीस शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश कचरे, मच्छिंद्र आर्ले, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, तालुकाध्यक्ष अशोक भोसले, प्रशांत भराट, बाळासाहेब गर्जे, अमोल देवढे, हरिभाऊ कबाड्डी, दादासाहेब पाचरणे, विकास साबळे, शिवाजी साबळे, लक्ष्मण टाकळकर, संजय टाकळकर, नानासाहेब कातकडे नारायण पायघन, अंबादास भागवत, अतुल म्हस्के, आम आदमीचे शरद शिंदे, विनोद शेळके, जगन्नाथ भागवत उपस्थित होते.
संबंधित बातम्या :
गेल्या हंगामात गाळप उसाचा दिवाळीपूर्वी प्रति टन तीनशे रूपये दुसरा हप्ता मिळावा, यंदाच्या गळीत हंगामास प्रति टन तीन हजार शंभर रुपये प्रमाणे पहिला हप्ता द्यावा, अन्यथा कोणत्याही कारखान्याने ऊस तोड सुरू करू नये, प्रति टन तीन हजार शंभर रूपये पहिले पेमेंट रोख देणार्या कारखान्यास प्राधान्याने ऊस पुरवठा केला जाईल आदी मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रथम तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर तहसीलदार प्रशांत सांगडे नगरच्या प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी प्रवीण लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर, केदारेश्वर, गंगामाई साखर कारखान्याचे प्रतिनिधी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यात चर्चा होऊन दिवाळीपूर्वी ऊस उत्पादक शेतकर्यांना मिळणार्या दुसर्या हप्त्या संदर्भात साखर सहसंचालक यांनी परिसरातील कारखान्यांशी चर्चा करून ऊस उत्पादक शेतकर्यांना न्याय मिळवून देण्याचा केलेला प्रस्ताव बैठकीत संमत करण्यात आला. चर्चेत ज्ञानेश्वरचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे , केदारेश्वरचे प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, गंगामाईचे प्रशासकीय अधिकारी अर्जुन मुखेकर, वृद्धेश्वरचे शेतकी अधिकारी कचरे आदींनी सहभाग घेतला.
यंदाच्या पावसाळ्यात पावसाचा खंड पडल्याने ऊसाचे उत्पादन कमालीचे घटणार त्यामुळे शेतकर्यांना या नुकसानीची काही प्रमाणात भरपाई मिळावी यासाठी दसरा दिवाळी पुवी गत हंगामात गाळप झालेल्या उसाला जादा रक्कम मिळावी, या मागणी संदर्भात साखर कारखान्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पूर्वीच स्वाभिमानीच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, याबाबत साखर कारखान्यांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने ठिय्या आंदोलन करणे भाग पडल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.